Sunil Mendhe : भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या रामरथ यात्रेचा समारोपीय कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. रथयात्रेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे जाहीर भाषण चांगलेच गाजले आहे. खासदार सुनील मेंढे यांना जाहीर सभेत भोंडेकर यांनी दिलेली हमी चर्चेचा विषय ठरली आहे.
आमदार भोंडेकर यावेळी खासदा मेंढे यांना उद्देशून म्हणाले की, ‘तुम्ही राम असून मी तुमच्या मागे लक्ष्मणाप्रमाणे राहणार आहे.’ शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खासदार सुनील मेंढे यांना जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे वचन दिले आहे.
आमदार भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या या विधानामुळे खासदार सुनील मेंढे यांना भाजपकडून भंडारा-गोंदिया लोकसभेचे तिकीट कन्फर्म झाल्याच्या चर्चेने दोन्ही जिल्ह्यात जोर धरला आहे. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हे सूचक विधान केल्याचे सांगण्यात येत आहे. आपण लक्ष्मणाप्रमाणे सुनील मेंढे यांना पदोपदी मदत करणार असल्याचे वचन त्यांनी दिले आहे. त्यामुळे भोंडेकर यांच्या भाषणाने महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे समीकरण चांगलेच जमल्याचे दिसत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवली जाणार आहे. या लोकसभा मतदार संघावर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही दावेदारी केली आहे. त्यातही भाजपामध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत भाजप इच्छुकांची गर्दी वाढली आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही आपले दावेदारी ताकतीने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारसेवक असलेले सुनील मेंढे यांनी आपल्या मतदारसंघात राम रथयात्रा सुरू केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अख्खा मतदारसंघ मेंढे यांनी पिंजून काढला होता. रविवारी (ता. 21) यात्रेचा समारोप खात रोड येथे आयोजित एका कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे दमदार भाषण ठोकले. हे भाषण खासदार मेंढे यांचे मनोबल वाढविणारे ठरले. सुनील मेंढे यांना उद्देशून भोंडेकर म्हणाले की, ‘तुमच्या रामरथ यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) आले, म्हणजे तुमची लोकसभेची टिकीट कन्फर्म झाली आहे, असे समजा. त्यामुळे आता काळजी नाही. तुम्ही लोकसभेच्या कामाला लागा. मी लक्ष्मणाप्रमाणे तुम्हाला साथ देईल.’
भाजप खासदार सुनील मेंढे आणि शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जवळीकता अलीकडच्या काळात बरीच वाढली आहे. भोंडेकर यांच्या कार्यक्रमात उपस्थित भाजप खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या भाषणात भोंडेकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. युवा आमदार, कर्तव्यदक्ष आमदार, जनतेचा आमदार अशा अनेक उपमांच्या अलंकारांनी बनवलेला हार मेंढे यांनी भोंडेकर यांना घातला होता. तेव्हाच भोंडेकर आणि मेंढे यांचे सातही सूर जुळल्याचे जाणकारांच्या लक्षात आले. भाजप खासदार मेंढे यांच्या कार्यक्रमात नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर भाषणात चक्क सुनील मेंढे यांना राम व स्वतःला (भोंडेकर) लक्ष्मणाची उपमा दिल्याने दोघांमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचे दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.