
Nagpur News: विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागताच शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सुरुंग लावणे सुरू केले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांनी आपल्या पक्षात घेतल्यानंतर आता विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणीने बंडाची भाषा सुरू केली आहे. त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बुलढाणा कार्याध्यक्ष आहेत.
गायत्री शिंगणे यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले आहेत. या फोटोंची बुलढाणा जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. याशिवाय गायत्री यांनी मतदारसंघातील नेत्यांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम सुरू केला आहे.अनेक वर्षांपासून आमदार असताना काकांनी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा काहीच विकास केला नसल्याचे त्यांनी जाहीर आरोप केला आहे. या घडामोडी बघता गायत्री शिंगणे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या भावी उमेदवार असल्याची चर्चा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सुरू झाली आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात आरोग्य मंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघात शिंगणे कुटुंबीयांचा चांगलाच दबदबा आहे. सहकार महर्षी भास्करराव शिंगणे (Bhaskarrao Shingane) आणि त्यांच्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना या मतदारसंघाने साथ दिली आहे. आता मात्र पुतणी गायत्री शिंगणे यांनी काकांनाच आव्हान देणे सुरू केले आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघात आता बदल पाहिजे. मागील २५ वर्षांत विकास कुठेच दिसत नाही. डॉ. शिंगणे यांनी विकासाची पाच कामे तरी दाखवावीत असा आरोप करून गायत्री यांनी त्यांनी फक्त आजवर भूमिपजूनाचे नारळ फोडण्याचे काम केले असल्याचे सांगितले. निवडणूक आली डॉक्टर शिंगणे रडगाणे सुरू करतात, भास्करराव शिंगणे यांचे नावाने मत मागतात अशी टीकाही गायत्री शिंगणे यांनी केली आहे.
शदर पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेल्या विदर्भातील मतदारसंघामध्ये सिंदखेड राजा या मतदारसंघाचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्यावतीने नव्या व सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. गायत्री शिंगणे या त्यांना गवसल्या असल्याचे बोलले जात आहे. गायत्री या आजवर काकांच्या विरोधात कधी बोलल्या नाहीत. मात्र आता उघडपणे टीकाटीपणी आणि आरोप सुरू केल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीला लावले असल्याचे दिसून येते. आजवर पवार, अनिल देशमुख, गोपिनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील काका पुतण्याची राजकीय लढत सर्वांनी बघितली आहे. यात आता शिंगणे कुटुंबीयांची भर पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.