
NCP local elections strategy : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन सुमारे 25 वर्षे झाली आहे. यातही सुमारे 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. असे असतानाही विदर्भात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसला आपली पाळेमुळे घट्ट करता आली नाही.
विधानसभाच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादींच्या सदस्यांची संख्या नगण्यच आहे. यामागचे प्रमुख कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषदेचे सदस्य संजय खोडके यांनी सांगितले. आपला पक्ष वाढावायचा असेल, तर यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आणि आघाडीच्या भानगडीत पडू नका, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचविले.
नागपूर आणि अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा नागपूरमध्ये झाला. यावेळी आमदार संजय खोडके म्हणाले, "एकेकाळी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 आमदार होते. आता ही संख्या सहावर आली आहे. आधी काँग्रेससोबत आघाडी होती. त्यामुळे आपल्या वाट्याला कमी जागा येत होत्या. आता भाजपसोबत आपण महायुतीत आहेत".
भाजपचे (BJP) तब्बल 39 आमदार विदर्भातून निवडून आले आहेत. त्यामुळे आपली जागा वाटपाची ताकद आणखीच कमी झाले आहे. एकूणच आधी आघाडी आणि आता महायुतीमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे दिसून येते. विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर टक्के निकाल दिला आहे. सहापैकी सहा जागांवर आपले उमेदवार निवडून आले. वरुड विधानसभा हा आपला हक्काचा मतदारसंघ होतो. तो भाजपने हिरावून घेतला. अन्यथा आणखी एक जागा आपल्या पदरात पडली असती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आपली संघटना कमजोर आहे हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. आज विदर्भातील 62 जागांवर 39 भाजप, आठ काँग्रेस, शिवसेना ठाकरे सेना, चार एकनाथ शिंदे सेना आणि सहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हे बघता भविष्यात कसे लढायचे आणि किती जागा मागायच्या याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे. युती करायची की स्वतंत्रपणे लढायचे याचाही निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे, असे संजय खोडके यांनी सांगितले.
मात्र त्याकरिता आपली ताकद वाढवावी लागले. पदाधिकाऱ्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. हा निवडून आला, तो निवडून आला, तर आपले महत्त्व कमी याची चिंता सोडावी लागले. काही लोक चांगले संघटक असतात. मात्र ते निवडून येऊ शकत नाही. त्यांचा वेगळा विचार पक्षाने करावा. वेगळी जबाबदारी द्यावी. मात्र पक्षातील उमेदवाराला विरोध करू नये, असा सल्लाही संजय खोडके यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस गांभीर्याने काम करणार असेल तर इतर पक्षातील चांगले उमेदवार आपल्याकडे येतील. विदर्भाकडे यापुढे दुर्लक्ष करणार नाही याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल विदर्भासाठी आग्रही असतात. मुंबईत जाऊन भांडतात. विधान परिषदेची एक जागा विदर्भालाच द्या, यासाठी ते भांडले म्हणून मी आमदार होऊ शकलो, असेही यावेळी संजय खोडके यांनी प्रामाणिकपणे सांगितले.
काही पदाधिकारी मुंबईतच अधिक दिसतात. त्यांना त्यांच्या गावतील ग्रामपंचायतीची परिस्थिती माहिती नसते. निवडून आणता येत नाही, असा टोला लगावताना या लोकांविषयी आपल्याला राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच वरिष्ठ तसेच अनुभवी लोकांनी ग्राऊंडवर कसे लढायचे, पक्षातील सदस्यांना अधिकाधिक कसे निवडून आणायचे याचीही काळजी घ्यावी, असाही सल्ला संजय खोडके यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.