निष्क्रिय लोकप्रतिनिधींना नितीन गडकरींनी दिला गंभीर इशारा...

कार्यकर्तृत्‍वाने देशभरात ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते महापालिकेत सत्कार करण्यात आला
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

नागपूर ः नागपूर (Nagpur) महानगरपालिकेत काल नगरसेवक असलेले सर्वजण आज माजी झाले. पुन्हा उमेदवारी मिळेल, असे भाजपच्या नगरसेवकांना वाटत आहे. पण यावेळी भाजप ३० टक्के उमेदवार बदलेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे काहींना धास्ती बसली आहे. त्यातच ‘जे जे जनतेची कामे करतात त्यांना नक्कीच उमेदवारी मिळेल. परंतु, तिकिटासाठी जे आमच्या घरी फेऱ्या मारतात त्यांचे काय करायचे.’, असा प्रश्‍न नितीन गडकरींनी करून निष्क्रिय लोकप्रतिनिधींना गंभीर इशारा दिला आहे.

राजकारणात आपले स्थान पक्के असावे, वाटणे साहजिक आहे. आपल्याला प्रतिस्पर्धी असू नये, असेही कित्येकांना वाटत असते. पण गेल्या पाच वर्षांत ज्यांनी कामेच केली नाहीत, त्यांना यावेळी तिकीट दिले जाणार नाही. त्यामुळे काही नगरसेवक (Corporator) चांगलेच धास्तावले आहेत. अशातील काही लोकांनी इतर पक्षांची चाचपणी सुरू केल्याचे समजते. तर काहींनी आधीच इतर पक्षांची वाट धरल्याचेही सांगण्यात येत आहे. महानगरपालिकेत (Municipal Corporation) यावेळी भाजप काही नवीन चेहरे देणार, हे मात्र नक्की.

कार्यकर्तृत्‍वाने देशभरात ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते महापालिकेत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मनपाचा मानाचा दुपट्टा, स्मृतिचिन्ह, तुळशी रोपटे देउन यावेळी सत्कारमूर्तीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, मागील पाच वर्षात महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांनी विविध विकासकामे केली. जनतेने त्यांचा प्रतिनिधी म्हणून टाकलेल्या विश्वासावर खरे उतरण्याचा प्रयत्न केला. जनतेने नेतृत्वाची संधी देणे हाच या लोकप्रतिनिधींचा सर्वोच्च सन्मान आहे. सार्वजनिक आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करून देण्यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेची शहरबस वाहतूक मेट्रोकडे सोपवून नागपूरकरांचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. नागरिक मंत्री, खासदार, आमदार यांना विचारणार नाही, पण नगरसेवक हा त्यांच्या हक्काचा माणूस असतो. नगरसेवकांचा संपर्क जनतेशी असलेली जवळीक यावर त्यांच्या कामाचे रिपोर्टकार्ड तयार होत असते.

Nitin Gadkari
गडकरी म्हणाले, फॉरेस्टवाले निकम्मे आहेत; तुम्ही नावे द्या, त्यांचा सीआर खराब करतो…

डॉ. दीक्षित मेट्रो मॅन..

नितीन गडकरी यांनी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांचा ‘मेट्रो मॅन’ म्हणून उल्लेख केला. ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर यांचे युक्तिवाद ऐकण्यासाठी स्वत: न्यायालयात जात असल्याचे त्यांनी सांगितले. सोलर इंडस्ट्रीजचे सत्यनारायण नुवाल यांनी नवे उद्योगविश्व निर्माण केले. सामाजिक दायित्वातही ते अग्रेसर असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला. बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड, राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता श्रीनभ अग्रवाल, बॉक्सिंग चॅम्पियन अल्फिया पठाण, ज्युनिअर ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता, स्केटिंगपटू अद्वैत रेड्डी यांनीही नागपूरची मान उंचावल्याचे गडकरी म्हणाले.

नागपूर गौरव गीताचा सन्मान..

शहराची महती सांगणारे एक गीत असावे या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या स्पर्धेतून शैलेश दाणी यांच्या सर्वोत्कृष्ट गीताला ‘नागपूर गौरव गीत’ म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांना ३१ हजार रुपये प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय पुरस्कार मोरेश्वर मेश्राम यांना २१ हजार रुपये, डॉ. राधा धात्रक यांना ११ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार तर शैलजा नाईक व प्रतिभा जोहरापुरकर यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com