Maharashtra Politics : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधील गटबाजी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधातील प्रदेश कमिटीवरील गट चांगलीच सक्रिय झाला आहे. पटोले यांना कोंडीत पकडण्यासाठी या गटाने महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी जवळीक साधली आहे. चेन्नीथला यांनीही पटोले विरोधकांना ‘एन्टर्टेन’ करण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस मधील अगदी ‘पीन पॉइन्ट’ माहितीही चेन्नीथला यांना बसल्या जागी मिळत असल्याने त्यांनी पटोले विरोधी गटाला ‘टच’मध्ये राहण्यास सांगितले आहे. चेन्नीथला यांच्या या निरोपामुळे मात्र प्रदेश काँग्रेसमधील पटोले समर्थकांची अस्वस्थता चांगलीच वाढली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधकांची महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी नुकतीच भेट घेतली. सहाजिकच भेट घेणाऱ्यांनी पटोले यांच्या विरोधात चेन्नीथला यांच्याजवळ चांगलीच गरळ ओकली. भेट घेणाऱ्या सर्वांना चेन्नीथला यांनी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रभारींच्या या सल्ल्यानंतर पटोले विरोधकांना बळ मिळाल्यासारखे झाले आहे. समर्थकांची चिंता मात्र वाढली आहे.
प्रदेशाध्यक्ष असल्याने महाराष्ट्रातील निवडणूक नाना पटोले यांच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे. काँग्रेसनेही तसे स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने पक्षातील सर्वोच्च नेत्यांपैकी महत्त्वाचे असलेल्या राहुल गांधी यांच्या नाना पटोले थेट संपर्कात असतात. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जरी मल्लीकार्जुन खर्गे असले तरी खर्गे गांधी कुटुंबाच्या शब्दाबाहेर नाही, हे सर्वश्रूत आहे. अशात राहुल यांच्या ‘ब्रिगेड’मध्ये असलेल्यांपैकी नाना पटोले हे नावही महत्त्वाचे आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाना पटोले यांना शह देण्यासाठी दिल्लीत डाळ शिजत नसल्याने आता रमेश चेन्नीथला यांच्या माध्यमातून पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये किती असंतोष आहे, हे पोहोचविण्यासाठी विरोधी गट सक्रिय झाला आहे. विरोधकांनी पटोले यांना घेरण्यासाठी ‘लॉबिंग’ सुरू केले आहे. अशात काही नेत्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची नागपूर येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली.
प्रदेश काँग्रेसबाबत सुरुवातीला चेन्नीथला यांना चर्चा करण्यात कोणतेही स्वारस्य नव्हते. परंतु पटोलेविरोधी गटाने प्रयत्न सोडले नाही. त्यांनी शेवटपर्यंत चेन्नीथला यांचा पिच्छा पुरविला. केवळ दोन मिनिट द्यावेत अशी विनंती त्यांनी सातत्याने चेन्नीथला यांच्याकडे केली. त्यामुळे प्रभारींचाही नाईलाज झाला. विरोधकांचे म्हणणे ऐकल्यानंतर चेन्नीथला यांनी त्यांना संपर्कात राहा असे मोठ्याने सांगितले. यावेळी काँग्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित होते.
चेन्नीथला यांना सर्वांसमक्ष संपर्कात राहा असे मोठ्याने सांगितल्याने विरोधकांची छाती फुगली. प्रभारींच्या या संदेशाचे अनेक तर्कवितर्क काँग्रेसमध्ये आता लावले जात आहेत. चेन्नीथला यांना नागपुरात भेटण्यापूर्वी पटोले विरोधकांनी काही दिवसांपूर्वी पत्रप्रपंच केला होता. या पत्रात पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली होती. आदिवासी समाजाला प्रदेशाध्यक्ष पदावर नेतृत्वाची संधी देण्याची मागणी केली होती.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे नाव अप्रत्यक्षपणे या पत्रातून पुढे करण्यात आले होते. पटोले विरोधी गटाने यापत्रात कोणत्या उमेदवाराला काँग्रेसने कोणत्या मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, याचीही यादीही सादर केली. काँग्रेसश्रेष्ठींना पाठविण्यात आलेल्या या पत्रावर विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्वाक्षऱ्यांसमोरील नावे पाहता या पत्राची काँग्रेसकडून गंभीर दखल घेतली जाईल, असे वाटत नाही. त्यामुळे विरोधी गटाने आता चेन्नीथला यांच्याशी ‘नेटवर्क कनेक्टिव्हिटी’ ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.