Lok Sabha Election Politics : महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांबाबत काँग्रेस उद्या आपल्या सर्व नेत्यांसमवेत दिवसभर विचारमंथन करून धोरण निश्चित करणार आहे. (Latest Marathi News)
विभागातील नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी आणि नगर दक्षिण या आठ लोकसभा मतदारसंघ बाबत उद्या पक्षाची धुळे येथे बैठक होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथाल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांसह सर्व वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसची बैठक दोन टप्प्यात होणार असून सकाळच्या सत्रात जिल्हाध्यक्ष आमदार माजी खासदार आणि जिल्हा परिषद व महापालिकेचे पदाधिकारी आणि दुपारच्या सत्रात पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष ते जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्याशी चर्चा होईल. यामध्ये प्रामुख्याने मतदारसंघ निहाय पक्षाचे पदाधिकारी, यंत्रणा, बूथ स्तरीय कार्यकर्ते आणि राजकीय वातावरण याबाबत आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्यातून महाविकास आघाडीच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी किती मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असावेत, याबाबतची रणनीती निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने धुळे येथे होणारी ही बैठक महत्त्वाची आहे.
सध्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ खासदार भाजप आघाडीचे आहेत. यामध्ये नाशिकचे हेमंत गोडसे आणि शिर्डीचे सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत शिर्डी धुळे आणि नंदुरबार या तीन मतदारसंघात उमेदवार दिले होते. उर्वरित पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते.
सध्या परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हा प्रमुख पक्ष आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी हे नवे सहकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर प्रामुख्याने शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस उमेदवार देणार आहेत. यातील कोणत्या जागा काँग्रेसने घ्याव्यात याचा प्राथमिक निर्णय उद्याच्या विचार मंथनातून होण्याची शक्यता आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.