Seven devotees died in Paras : अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे रविवारी दुर्दैवी दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर जवळपास २७ भाविक जखमी झाले. जखमींची विचारपूस करण्यासाठी काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व कृषी मंत्री अब्दुल सत्तार सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी रुग्णांना धीर दिला. (Girish Mahajan and Agriculture Minister Abdul Sattar reached Sarvopachar Hospital)
‘तब्येत कशी आहे, घाबरू नका सारं ठीक होईल. सरकार तुमच्या पाठीशी आहे’, म्हणत धीर दिला. त्यासोबतच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बाळापूर तालुक्यातील पारस येथे श्री बाबूजी महाराज संस्थानामध्ये रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मंदिरात आरती सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे दीडशे वर्ष जुने महाकाय कडुनिंबाचे झाड येथील टिनशेडच्या सभामंडपावर कोसळले.
या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला. २९ जणांवर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून कृषिमंत्री अब्दुल सत्तार काल सर्वोपचार रुग्णालयात भेट दिली. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर सत्तार आले होते. त्यांनी जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांना शासन नियमाप्रमाणे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कृषिमंत्री सत्तार दुपारी १२.३० वाजता सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले.
त्यांच्या सोबत आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जीएमसीच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, शिवसेनेचे संदीप पाटील, भाजपचे नारायणराव गव्हाणकर, योगेश बुंदेले होते.
सदर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन दुपारी ३ वाजता सर्वोपचार रुग्णालयात पोहोचले. त्यांनी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभाग, शल्यक्रिया कक्षासह इतर कक्षांमध्ये भरती रुग्णांची भेट घेतली. त्यांनी रुग्णांची आस्थेने विचारपूस करत त्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करेल, असेही सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर अर्चना मसने, डॉ. अशोक ओळंबे, हरिष अलीमचंदाणी, आशिष पवित्रकार, अनुप धोत्रे, अक्षय जोशी आदी उपस्थित होते.
स्थानिकांच्या मदतीचे कौतुक..
पारस गावाच्या बाहेर असलेल्या श्री बाबूजी महाराज संस्थान परिसरात महाकाय वृक्ष कोसळल्याचे बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दबलेल्या भाविकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान जेसीबी व अन्य उपकरण मदतीसाठी याठिकाणी आणले. मंत्री अब्दुल सत्तार गिरीश महाजन यांनी स्थानिकांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक केले.
अधिकाऱ्यांचा रात्री ठिय्या..
पारस येथील दुर्घटनेची माहिती रात्री उशिरा मिळताच अमरावती (Amravati) येथून विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे अकोल्यात पोहोचल्या. त्यांनी जखमींवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती सर्वोपचार रुग्णालयात पोहोचून घेतली. त्यासोबतच जिल्हाधिकारी (Collector) निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जि.प. अध्यक्ष संगिता अठाऊ, जि.प. समाज कल्याण समिती सभापती आम्रपाली खंडारे, आमदार रणधीर सावरकर व इतरांनी रात्रभर रुग्णांच्या सेवेसाठी सर्वोपचार रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. रुग्णालयात दाखल प्रत्येक रुग्णाला वेळेवर उपचार मिळावा यासाठी प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी झटले.
रुग्णसेवकांची मोलाची मदत..
पारस येथील दुर्घटनेत जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्स व इतर गाड्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi) रुग्णसेवक पराग गवई यांच्यासह विकास सदांशिव व इतरांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांना स्ट्रेचरवर झोपवून व उचलून रुग्णालयात नेले. रुग्ण कल्याण समितीचे नितीन सपकाळ यांनीसुद्धा मदत केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.