Police Constable's Commotion : एका सत्ताधारी आमदाराच्या नावाने दम देत थेट पोलिस कर्मचाऱ्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धुडगूस घातला. एवढेच नव्हेतर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन चालकासह शिपायाला धक्काबुक्की केली. हा कारभार चव्हाट्यावर येताच जिल्हाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांना कॉल करून पोलिसांना पाचारण केले.
यवतमाळ शहर पोलिसांनी त्या शिपायाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे तो शिपाई वर्दीत होता. एवढेच नव्हेतर तो मद्यधुंदीत असल्याचेही सांगितले जाते. प्रसाद उर्फ पिंटू जवळेकर असे धुडगूस घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो यवतमाळ जिल्हा पोलिस वाहतूक शाखेत कार्यरत आहे. आज दुपारी नेहमीप्रमाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दैनंदिन कामकाज सुरू होते. दरम्यान तेथे पोलीस शिपाई प्रसाद आला.
त्याने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या दालनापुढे कर्तव्यावर असलेल्या शिपायाशी दालनात जाऊ देण्यावरून वाद घातला. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांचा चालक धावून आला. यावेळी त्याने शिपाई प्रसादची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्याने सत्तेतील एका आमदाराचे नाव घेत पाहून घेण्याची भाषा केली. एवढ्यावरच तो थांबला नाहीतर दोघांनाही त्याने धक्काबुक्की केली. त्याचा धुडगूस वाढतच असल्याचे पाहून वाहन चालकाने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या दालनात धाव घेतली.
आशिया यांना घटनेची माहिती दिली. तेंव्हा जिल्हाधिकारी आशिया यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांना कॉल करून घटनेची माहिती दिली. तसेच तात्काळ पोलिस पथक पाठविण्याचे आदेश दिले. त्यावरून यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश बैसानी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. पाठोपाठ यवतमाळ शहर ठाणेदार सतीश चवरे पथकासह तेथे दाखल झाले.
पथकाने आरडाओरड करीत असलेला पोलिस शिपाई प्रसाद याला ताब्यात घेतले. शिवाय वैद्यकीय चाचणीसाठी येथील शासकीय रुग्णालयात नेले. विशेष म्हणजे तो घटनेच्यावेळी गणवेशात मद्यधुंद असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी बोलताना सांगितले. पोलिस त्याचा ताबा घेत असतानाही त्याने सत्ताधारी एका आमदाराचे नाव घेत त्यांनाही दम भरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
आमदाराचे नाव घेण्यामागची अशी आहे 'गोम'
काही महिन्यांपूर्वी पोलिस शिपाई प्रसाद हा एका आमदाराचा सुरक्षारक्षक होता. यादरम्यान त्याने संबंधित आमदाराच्या कुटुंबियांशी नावाप्रमाणे 'जवळीक' केली. त्यानंतर त्याच संबंधातून झालेल्या शिफारशीवरून वाहतूक शाखा त्याच्या पदरात पडली. तो वाहतूक शाखेत कार्यरत असतानाही आमदार आणि कुटुंबियांशी तो मधुर संबंध ठेवून आहे. याच संबंधातून तो नेहमीच आमदारांच्या नावावर पोलिस असूनही 'दादागिरी' करीत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिस निरीक्षकावर होता राग..
जिल्हा पोलिस वाहतूक शाखेत मनुष्यबळ पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे त्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर नेमावे लागते. सहाजिकच तास दीड तास अतिरिक्त कर्तव्य बजावून घ्यावे लागते. नेमकी हीच बाब पोलीस शिपाई प्रसादला सहन झाली नाही. त्यामुळे तो वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांची तक्रार करण्यासाठी मद्यधुंदीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.