Gondia Constituency : नववर्षाला सुरुवात झाल्यापासून गोंदिया शहरात राजकारण्यांसह अनेक सामाजिक संस्थांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. नववर्षासह अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे बॅनर व होर्डिंग मागील दोन महिन्यांपासून मुख्य चौकात लावण्यात आले आहेत. यातील बहुतांश बॅनर राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांचेच आहे.
सण आणि उत्सवाच्या शुभेच्छा, वाढदिवस, दिन विशेष, नियुक्त्यांनंतर करण्यात येणारे अभिनंदन यामुळे निवडणुकीपूर्वीच गोंदियात जिकडे-तिकडे चोहीकडे, बॅनर दिसती सगळीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
होर्डिंग लावताना नगर पालिकेची रितसर परवानगी घ्यावी लागते. यातील किती होर्डिंग परवानगीने लागले आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून शहरात ही बॅनरबाजी सुरू झाली आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी झाली. राजकीय नेत्यांसह, सामाजिक संस्था, खासगी व्यक्तींचे बॅनरही मोठ्या संख्येने दिसून लगाले आहेत. लोकसभा व त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवत ही बॅनरबाजी होत आहे.
यातील अनेक बॅनर विनापरवानगी लागले आहेत. नेमके किती बॅनर परवानगीने लागले आहेत, याची माहिती फक्त गोंदिया नगर परिषदेकडेच आहे. अनेक दिवसांपासून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. काही ठिकाणी वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बॅनरबाजीने पुन्हा एकदा शहरातील महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर शक्ती प्रदर्शन होताना दिसून येत आहे. शहरातील जयस्तंभ चौकातून नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी दररोज येणे-जाणे करतात. त्यांना या बॅनरबाजीचा विसर पडला आहे की काय? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहरातील मुख्य चौक, रस्त्यांसह प्रशासकीय इमारती समोर कोणी भावी आमदाराचे बॅनर लावले आहेत, तर कोणी जन्मदिनाच्या शुभेच्छांचे बॅनर लावून शक्ती प्रदर्शन केले करीत आहेत. उल्लेखीय असे की, फुलचूर नाका परिसरापासून मनोहर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक, भवानी चौक, पाल चौक अशा परिसर मोठाले बॅनर लागले आहेत.
शहरातील बॅनरच्या या समस्यकडे गोंदिया नगर परिषद प्रशासनाचे लक्ष का जात नाही? असा सवाल आता शहरवासियांमध्ये उपस्थित होत आहे. एकीकडे नगर परिषदेकडून स्वच्छतेचा नारा दिला जात आहे. बॅनरविरोधात नगर परिषद मोहिम राबिवत असते. कारवाई सुद्धा केली जाते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील सर्वच मुख्य मार्गावर बॅनरबाजी करून शक्ती प्रदर्शन केले जात आहे. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट बॅनरबाजीच्या प्रमाणात आणखी वाढ झाल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य मार्गावरील बॅनरवरही नगर परिषदेकडून कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे नगर परिषद याकडे कानाडोळा करते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.