Lok Sabha Election : आंबेडकरांचा हल्ला : मोदींचा ‘माइंड गेम’ समजण्यात काँग्रेस कमजोर

Prakash Ambedkar : ...तर भाजप दीडशे पार पण जाणार नाही
Prakash Ambedkar on BJP & Congress
Prakash Ambedkar on BJP & CongressSarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi : नरेंद्र मोदींना पराभवाचे संकेत मिळाल्याने त्यांनी आता जाता जाता भारतरत्न वाटप सुरू केले आहे. काँग्रेससोबत मोदी ‘माइंड गेम’ खेळत आहेत. हा खेळ काँग्रेसला समजत नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत केला.

देशात कोट्यवधी रामभक्त आहेत, पण सातपैकी चार शंकराचार्यांचा राममंदिर लोकार्पणास विरोध होता. असे असताना मोदींनी थेट चार शंकराचार्यांना बाजूला ठेवत राममंदिराचे लोकार्पण केले. काँग्रेस यावर ‘फोकस’ करून देशात काहीच बोलत नाही. मोदींनी शंकराचार्यांना ‘बायपास’ करून केलेले लोकार्पण ग्रामीण भागातील लोकांना मान्य नाही. याचे कारण म्हणजे आजही ग्रामीण भागात शुभ काळात श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले नसल्याची व शंकराचार्यांचे म्हणणे योग्य असल्याची भावना अॅड. आंबेडकरांनी व्यक्त केली.

Prakash Ambedkar on BJP & Congress
Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’मधील प्रवेशाने ‘ते’ मनोज जरांगे पाटील ‘प्रकाश’झोतात

देशात ‘ईव्हीएम’ न वापरता निवडणूक घेतली तर भाजप दीडशे जागा पण पार करणार नाही. ‘ईव्हीएम’ मदतीला असल्याने 400 पारचा नारा मोदी देत आहेत. ‘ईव्हीएम’ची मतमोजणी त्याच दिवशी करा, त्याच बरोबर ‘व्हीव्ही पॅट’च्या चिठ्ठ्यांची मोजणी मतदानाच्या दिवशी करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

देशात जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे पंतप्रधान सांगत असताना प्रकाश आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल हे कुठल्याही प्रकारच्या कुबड्या देण्याच्या विरोधात होते, पण नरेंद्र मोदींनी पटेल यांचे वाक्य नेहरूंच्या तोंडी टाकल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. या विषयावर ते सविस्तर मत मांडणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. देशात जातीय जनगणना होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जातीनिहाय जनगणनेतून 1931 मध्ये असलेल्या जाती शिल्लक राहिल्या की त्यांचा आर्थिक नरसंहार (इकनॉमिक जेनोसाइड ) झाला, याचा खुलासा होईल, असेही आंबेडकर म्हणाले. व्यवसाय नष्ट झाल्याने अनेक ‘मायक्रो कम्युनिटी’ नष्ट झाल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सामाजिक समरसता आता दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पक्ष विस्तार करण्याची गरज होती. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही पक्ष विस्ताराचा भाग असल्याने विविध राज्यस्तरीय पक्षांमध्ये वादाने इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचा दावा आंबेडकरांनी केला. हा वाद काँग्रेसला टाळता आला असता, पण, एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे आघाडीची चर्चा करत असताना राहुल गांधी पक्ष विस्तारात अग्रेसर असल्याचा विरोधाभास आंबेडकरांनी अधोरेखित केला.

Prakash Ambedkar on BJP & Congress
Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’च्या ‘मिनिमम’मध्ये ‘मॅग्झिमम’ मागण्या

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरविण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी वर्तविली. 2019 मधील निवडणुकीत महाराष्ट्रात ‘वंचित’मुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ जागांवर पराभव पत्करावा लागलेला नाही, उलट त्यांच्यामुळेच ‘वंचित’ या जागांवर विजयी झाली नाही, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले.

2019 मधील निवडणुकीत या पक्षांना मुस्लिमांची मते मिळाली तर हिंदूंची मते ‘वंचित’ला मिळाल्याचा दावा आंबेडकरांनी केला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘वंचित’कडे हक्काचे दोन लाख मतदार आहेत. त्यामुळे ‘वंचित’ महाराष्ट्रात 48 जागांवर निवडणूक लढू शकतो, असा दावाही आंबेडकरांनी केला.

Prakash Ambedkar on BJP & Congress
Vanchit-Mahavikas Aghadi : ‘त्या’ पत्रानंतर वंचित-महाविकासच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पण आंबेडकर म्हणतात...

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तसेच ‘वंचित’ या चौघांना राजकीयदृष्ट्या जिवंत राहण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघ ठेवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सोडविण्याची गरज होती, पण ते त्यांना शक्य झाले नाही म्हणून ‘वंचित’ने ‘बारा’चा मुद्दा चर्चा सुरू करण्यासाठी दिला. त्या आकडेवारीवरून अडवणूक करीत नसल्याचा खुलासा आंबेडकरांनी केला.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘वंचित’ला आपली ताकद माहीत असल्याचा दावा आंबेडकरांनी केला. असे असताना ‘वंचित’ स्वतःहून महाविकास आघाडीच्या बाहेर जाणार नाही, असेही आंबेडकरांनी ठामपणे स्पष्ट केले. निवडणूक चिन्ह गेले की, नुकसान होते हा स्वानुभाव आंबेडकरांनी सांगितला. पण, त्याच वेळी निवडणूक आयोग केवळ राजकीय पक्षांची नोंदणी करण्यासाठी आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाला नाव आणि चिन्ह देऊ शकत नाही, असे मत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह व नाव शरद पवारांकडून गेल्याच्या मुद्द्यावर बोलताना व्यक्त केले.

वैचारिक मतभेद असल्याने ‘एनडीए’ सोबत जाऊ शकत नाही. त्याचबरोबर ज्याप्रकारे समाजवादी ही विचारधारा आहे, पण चळवळ झाली नाही. त्याचबरोबर महात्मा गांधींची विचाराधारा आहे, पण ती चळवळ होत नसल्याचे सांगत त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेबरोबर त्यांच्या विचारांची चळवळ होण्याची गरज व्यक्त केली.

Edited By : Prasannaa Jakate

R

Prakash Ambedkar on BJP & Congress
Prakash Ambedkar : मोठी बातमी ! अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना 'एनडीए'मध्ये येण्याची केंद्रीय मंत्र्यांची ऑफर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com