Akola Politics : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउटगोइंग वाढले आहे. अशात मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. परंतु हे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे खरेखुरे जरांगे नसून अकोल्यात त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे तुळशीराम गुजर आहेत.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहूब अकोल्यातील तुळशीराम गुजर दिसतात. त्यामुळे त्यांना पाहिल्यानंतर अनेक जण बुचकळ्यात पडतात. गुजर यांनी ‘वंचित’चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.
गुजर यांना पाहिल्यानंतर अनेकांना मनोज जरांगे पाटीलच अकोल्यात आले की, काय असे वाटले. बराच वेळपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात गुजर यांना उपस्थित लोक न्याहाळत होते. अशात काही वेळानंतर ‘वंचित’मध्ये आलेले गृहस्थ खरे मनोज जरांगे पाटील नसून त्यांच्यासारखे दिसणारे गुजर असल्याचे सर्वांना कळले.
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला होता. मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असेही अॅड. प्रकाश आंबेडकर त्यावेळी म्हणाले होते. अशातच अकोल्यातील जुने शहर भागात राहणारे व मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे गुजर हे ‘वंचित’मध्ये गेल्याने त्यांच्या रूपाने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे नाव ‘प्रकाश’झोतात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात राजकीय ‘इन्कमिंग’ वाढले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. संभाजी ब्रिगेडचे महानगरध्यक्ष योगेश ढोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे संभाजी ब्रिगेडला मोठे खिंडार पडले आहे.
लोकसभा निवडणुकीचे सर्वच पक्षांना वेध लागले आहेत. अशात अनेक राजकीय पक्षांमध्ये ‘इन्कमिंग’ आणि ‘आउटगोइंग’ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे आणण्यासाठी मोठा खटाटोप पक्षांकडून होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीचा ‘बिगुल’ कधीही वाजू शकतो. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 20 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि ‘वंचित’ अशी तिहेरी लढत या मतदारसंघात होते. प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याने येथील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. यंदाही निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभेत सलग अकराव्यांदा आपले नशिब आजमाविणार आहेत. यासाठी ‘वंचित’कडून जोरदार मोर्चेबांधणी करण्याला वेग आला आहे.
विरोधी पक्ष भाजपकडूनही मतदारसंघ ताब्यात कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी होत आहे. निवडणुकीपूर्वी विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना हेरण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पक्षात ‘इन्कमिंग’ करून घेण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न होऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला वेग आला आहे. निवडणुकीच्या फायद्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोयीनुसार पक्ष बदलताना दिसत आहेत.
भाजपकडूनही पक्षप्रवेश करून घेण्यावर भर दिला जात आहे. येत्या 15 फेब्रुवारीला भाजपकडून पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. या वेळी वेगवेगळ्या पक्षांतील जवळपास तीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.