Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक एक दिवस पुढे ढकलण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. जाहीर सभेचे कारण देत आंबेडकरांनी ही मागणी केली होती. परंतु बैठक पुढे ढकलण्यात आली नाही. त्यामुळे अखेर मंगळवारी (ता. 27) होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. महाविकास आघाडी आणि ‘वंचित’मध्ये नेमके चाललेय असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे. अगोदर म्हणायचे बैठक पुढे ढकला आणि अखेर आपले प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहतील असे आंबेडकर यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला असला तरी जागावाटपाचे घोडे मात्र अडलेलेच आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षात जागा वाटप निश्चित झाल्याचा दावा करीत ‘वंचित’कडून ठरलेल्या जागांची माहिती तीनही पक्षांना मागणार असल्याचे पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले होते. महाविकास आघाडीकडून 27 फेब्रुवारीच्या बैठकीचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ असेही अगोदर ‘वंचित’कडून सांगण्यात आले होते. मात्र सोमवारी (ता.26) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीकडे बैठकीची तारीख बदलण्याची मागणी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंगळवारी पुणे येथे सभा असल्याने एक दिवस बैठक पुढे ढकलण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. एकप्रकारे दबावतंत्राचा वापर ‘वंचित’कडून करण्यात आल्याची चर्चाही यामुळे रंगली. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीतील सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांना 27 फेब्रुवारीच्या बैठकीत सहभागी होण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती आहे.
अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीत सभा असली तरी ‘वंचित’कडून प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियातून दिली. पुण्यात महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडीकडून मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला पक्षाकडून प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांना पाठविण्यात येणार आहे. 24 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह 2 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्च किंवा कार्यक्रमात महाविकास आघाडीद्वारे वंचित बहुजन आघाडीला सहभागी किंवा आमंत्रित करण्यात आलेले नव्हते.
बोलावणे नसले तरी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहोत. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करणार आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही हीच विनंती केली होती, असेही आंबेडकर यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. ‘वंचित’कडून पुन्हा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे जाणार असल्याची माहिती ‘सरकारनामा’शी बोलताना देण्यात आली.
डॉ. पुंडकर 30 जानेवारी रोजीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत गेले होते. बैठकीत आपला अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चाही झाली होती. तब्बल एक तास बैठकीच्या ठिकाणाबाहेर आपल्याला बसविण्यात आल्याचे पुंडकर यांनी म्हटले होते. आता पुन्हा पुंडकर हेच बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी मुंबईत ही बैठक होणार आहे. बैठकीत महाविकास आघाडीत आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे पुंडकर यांनी म्हटले आहे.
एकीकडे महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश झाला असतानाच दुसरीकडे ‘वंचित’कडून संजय राऊत यांच्या टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा पक्षाचे पदाधिकारी चेतन अहिरे यांनी समाचार घेतला आहे. राज्यसभेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांचा सकाळ-संध्याकाळ चालवलेला प्रबोधनाचा कार्यक्रम अजून थांबवलेला दिसत नाही, अशी खोचक टीका अहिरे यांनी केली आहे. गेली कित्येक वर्षे भाजपमध्ये सत्तेत असताना तुम्हाला कधीच संविधान वाचविण्याची आठवण झाली नाही. भाजपने सोडचिठ्ठी दिल्यानंतर तुम्हाला संविधान वाचविण्याचा साक्षात्कार झाला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.