Vidarbh Political News : 'मोदी सरकारची हमी' लिहून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ वंचित बहुजन आघाडीकडून पुन्हा अडविण्यात आला आहे. 'मोदी सरकार' नाही 'भारत सरकार' असे म्हणत अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावला. यावेळी कार्यकर्त्यांनी रथ अडवून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला अनेक ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. कुठे गावकरी हा विरोध करीत आहेत. तर कुठे विरोधी राजकीय पक्षाकडून या रथाला विरोध केला जात आहे. आगामी निवडणुकीपूर्वी केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या रथाला विरोध होत आहे. दरम्यान यापूर्वीही अकोला जिल्ह्यात या रथाला विरोध झाला आहे. पुन्हा या रथाला वंचितकडून जोरदार विरोध झाल्याचे पाहायला मिळाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्र शासनाच्या (Central Government) योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारी (ता. 25) भारत संकल्प यात्रेच्या रथासह काही अधिकारी बार्शीटाकळी शहरातील कासम नाना चौकात पोहोचले. मोदी सरकार लिहिलेला रथ येताच वंचित बहुजन आघाडीचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. अधिकारी आणि रथाला यावेळी अडविण्यात आले.
यावेळी रथावर ‘भारत’ऐवजी मोदी सरकार (Narendra Modi) का लिहिले आहे? असा जाब कार्यकर्त्यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विचारला. वरिष्ठांकडून प्राप्त सूचनानुसार काम करीत असल्याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. रथावर लिहिलेल्या मोदी सरकार या शब्दातून केवळ एका व्यक्तीचा व विशिष्ट पक्षाचा प्रचार होत आहे. त्यामुळे भारत सरकार असा उल्लेख हवा. अन्यथा शासकीय कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांचा प्रचार करीत आहे. अशी फिर्याद पोलिसात देऊ अशी भूमिका वंचितकडून घेण्यात आली.
यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर कार्यक्रम बंद करून तातडीने रथ हद्दीतून बाहेर नेण्याची मागणी करण्यात आली. प्रचार करायचाच असेल तर मोदी सरकार ऐवजी भारत सरकारचे स्टिकर लावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काढण्यात आलेल्या या रथाला अनेक ठिकाणी विरोध वाढताना दिसत आहे. एकप्रकारे या माध्यमातून पक्षाचा आणि व्यक्तीचा प्रचार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होतांना दिसत आहे. त्यामुळे 'मोदी सरकारची हमी' असलेला प्रचार रथ भारत सरकारची हमी अद्यापही का करीत नाही असा सवाल करण्यात येत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.