Punvat Yavatmal News : पतीचा हस्तक्षेप सरपंच महिलेला पडला महागात; सीसीटीव्हीने फोडले बिंग अन् झाली अपात्र !

Yavatmal News : पतीने थेट जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली.
Punvat Grampanchayat, Yavatmal
Punvat Grampanchayat, YavatmalSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Political News : मासिक सभेत एका विषयावरील चर्चेदरम्यान ग्रामपंचायत सदस्याने सरपंच महिलेला धारेवर धरले. त्यावर निरुत्तर झालेल्या महिला सरपंचाने थेट कॉल करीत पतीराजाला सभेत पाचारण केले. त्यानंतर पतीने थेट जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. (The husband beat up the Gram Panchayat member who directly asked question)

घटनेनंतर मात्र असे काहीच झाले नाही, अशी भूमिका सरपंच, तिचा पती आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या मारहाणीचे बिंग फोडले. त्यावरून विभागीय आयुक्तांनी त्या सरपंच महिलेला अपात्र ठरविले. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पुनवट ग्रामपंचायतीत १९ सप्टेंबर २०२२ ला मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.

ग्रामपंचायत सदस्य संतोष टेंभूर्डे यांनी वॉर्ड क्रमांक एक व दोनमधील विषयांवर सरपंच पौर्णिमा संदीप राजूरकर यांना विचारणा केली असता, वाद निर्माण झाला. त्यानंतर सरपंचांनी तत्काळ कॉल करून पतीला ग्रामपंचायतीत बोलावले. संदीप राजूरकर यांनी थेट ग्रामपंचायत गाठून सदस्य संतोष टेंभुर्डे यांना बेदम मारहाण केली, असा आरोप दाखल तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून विस्तृत अहवाल सादर केला.

मासिक सभेच्या वेळी सात सदस्य उपस्थित होते, तर काही सदस्य निघून गेले होते. चौकशीदरम्यान काही ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेच्या वेळी अशी घटना घडलीच नाही, असे बयाण नोंदविले. मात्र, ग्रामपंचायतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेली घटना कैद झाली होती. पुनवट ग्रामपंचायतीत घडलेल्या या गंभीर घटनेची विस्तृत चौकशी केल्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यांनी सरपंच पौर्णिमा संदीप राजूरकर यांना अपात्र घोषित केले.

हा निकाल देताना आयुक्तांनी सरपंच राजूरकर यांनी कर्तव्यात कसूर तथा गैरवर्तणूक केल्याचा ठपका आदेशात ठेवला आहे. शिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३९ (१) मधील तरतुदीनुसार त्यांना सदस्य तथा सरपंच ग्रामपंचायत पुनवट या पदाकरिता अपात्र घोषित केल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे.

पतीराजच पाहतात कारभार...

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुरुष मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रात सक्रिय असतात. मात्र, एखादवेळी त्यांचा वार्ड अथवा प्रभागात महिला आरक्षण निघाल्यास ते पत्नी अथवा घरातील महिलेला निवडणूक रिंगणात उतरवितात. निवडून आल्यानंतर आणि महत्त्वाची पदे मिळाल्यानंतर त्या महिलांना कारभार न करू देता, तिला केवळ खुर्चीत बसवून पती अथवा कुटुंबातील पुरुषच कारभार पाहतो. या प्रकारालाही पुनवटच्या घटनेने पुष्टी मिळाली आहे.

Punvat Grampanchayat, Yavatmal
Yavatmal Crime : भाजपच्या बड्या नेत्यांशी ‘ती’ची जवळीक असली; पण ‘पोक्सो’त फसली !

...तर ३३ टक्के आरक्षणाची लागणार वाट

अलीकडेच केंद्र शासनाने महिलांना सर्वच क्षेत्रांत ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मांडले. नव्हे, तर आवाजी मतदानाने ते विशेष अधिवेशनात संमत झाले. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातही महिलांचा प्रभावी सहभाग राहणार आहे. मात्र, पुनवट ग्रामपंचायतीत घडलेल्या या घटनेने पुरुषांच्या हस्तक्षेपावरही आता सरकारला विचार करावा लागणार आहे; अन्यथा महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या निर्णयाची पुरती वाट लागेल, अशी चर्चाही येथील राजकीय वर्तुळात आहे.

Edited By : Atul Mehere

Punvat Grampanchayat, Yavatmal
BJP Yavatmal News : भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचा ‘तीन तिघाडा-काम बिघाडा’, ...तर '४५ प्लस' दिवास्वप्नच !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com