Yavatmal District Crime News : एका ११ वर्षीय बालिकेवर दोन डझनावर गुन्हे दाखल असलेल्या हिस्ट्रीशिटर नराधमाने अत्याचार केला. भाजपच्या बड्या नेत्यांशी जवळीक असल्याचा गवगवा करणाऱ्या ‘त्या’ महिला डॉक्टर तथा पदाधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले दंडक पायदळी तुडवीत, पीडित बालिकेचे फोटो आणि व्हिडिओ सहानुभूती मिळवण्यासाठी व्हायरल केले. (Photos and videos of the victim girl went viral to garner sympathy)
त्या महिलेविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटकही झाली आहे. विशेष म्हणजे ही महिला मुंबईतील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून उमरखेड विधानसभा मतदारसंघात सक्रिय होती. सुमारे चार दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील एका ११ वर्षीय बालिकेला वाटेत अडवून दुचाकीवरून शाळेत सोडून देण्याचा बहाणा विकृत नराधमाने केला. त्यानंतर शाळेत न सोडता निर्जनस्थळी नेत त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
नराधमाला ठोकल्या १२ तासांत होत्या बेड्या...
ही घटना पुढे आल्यानंतर त्या नराधम तरुणाला अवघ्या १२ तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिस तपासात त्या नराधमावर विविध पोलिस ठाण्यांतर्गत दोन डझनावर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले. शिवाय त्याचा या प्रकारचा तिसरा गंभीर गुन्हा असल्याचे उघड झाले. ही गंभीर बाब माध्यमांनी पुढे आणताच अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. शिवाय त्या नराधमाला फाशी द्या, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटल्या.
कुठल्याही पीडित बालिकेचे अथवा महिलेचे नाव पुढे येणार नाही, अथवा कुणी तसा प्रयत्न करू नये, असा दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला आहे. असे असताना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि केवळ जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी स्वतःला भाजपची पदाधिकारी आणि भाजपच्या बड्या नेत्यांशी जवळीक असल्याचे सांगणाऱ्या डॉ. साईली शिंदे यांनी त्या पीडित बालिकेचे भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले.
व्यावसायिकाची तक्रार...
ही बाब स्थानिक लक्ष्मीकांत मैड नामक व्यावसायिकाच्या लक्षात येताच त्याने उमरखेड पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून डॉ. साईली शिंदे यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अन्य कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच उमरखेड येथील राहत्या घरून त्यांना आज (ता. १४) दुपारी अटकही करण्यात आली.
डॉ. साईली शिंदे या मुंबई येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्या उमरखेड विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. त्या स्वतःला भाजप पदाधिकारी असल्याच्या खासगीत बोलताना सांगतात. शिवाय भाजपच्या बड्या नेत्यांशी जवळीक असल्याचेही त्या सांगतात.
अटकेसाठी गेलेल्या पोलिसांशी अरेरावी...
उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तेथील पोलिसांचे एक पथक डॉ. साईली शिंदे यांच्या अटकेसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या वेळी अटक टाळण्यासाठी शिंदे यांनी मोबाईलवरून काही लोकांशी (बहुधा नेत्यांशी) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पथकातील एका महिला पोलिसाने त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला.
शिवाय सोबत चालण्यास सांगितले. त्यावर मोबाईलची चार्जिंग कमी असल्याचे कारण शिंदे यांनी पुढे केले. हे कारण ऐकताच महिला पोलिस कर्मचाऱ्याने कॉल करणे बंद करून आधी मोबाईल चार्जिंग करा, असे सांगितले. त्यावर शिंदे चांगल्याच भडकल्या ‘आता तू मला शिकवशील का?’, असा प्रश्न करीत त्यांनी अरेरावी केल्याचे सांगण्यात आले.
भाजप कार्यकर्ताच तक्रारदार?
पोलिसात तक्रार देणारे लक्ष्मीकांत मैड यांनी स्वतःला त्यामध्ये सराफा व्यावसायिक असल्याचे सांगितले आहे. असे असले तरी ते भाजपचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांचे निकटवर्तीय तथा सक्रिय भाजप कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. मात्र, तक्रारीत त्यांनी भाजप पदाधिकारी अथवा कार्यकर्ता असल्याचे कुठेही म्हटलेले नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.