APMC Election News Pusad : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजवरच्या इतिहासात सामान्य शेतकऱ्याला संचालकपदाची निवडणूक लढविण्याची प्रथमच संधी मिळाली. त्यामुळे यंदा इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. बाजार समितीवर कायम वर्चस्व असलेल्या माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पॅनलच्या विरोधात त्यांचे पुतणे भाजपचे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वातील भाजप-सेना, अशी लढत यावेळी अपेक्षित आहे. (Against Manohar Naik's panel, his nephew BJP MLA Nilay Naik)
उमेदवारी मिळविण्यासाठी नाईक बंगल्यावर गर्दी वाढली आहे. एकूण १८ संचालकांच्या जागांसाठी येत्या ३० एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत. विविध कार्यकारी संस्था व ग्रामपंचायत या गटातील मतदार माजी मंत्री मनोहर नाईक यांना मानणारे असल्याने त्यांचीच भूमिका या निवडणुकीची दिशा ठरविणार आहे. परंतु बाजार समितीच्या गैरकारभारावर नाखुश असलेले शेतकरी व मतदार कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल दहा वर्षानंतर होत आहे. यापैकी आठ वर्ष निर्वाचित संचालक मंडळ होते. त्यात एक वर्ष दिवंगत एल. डी. राठोड, दोन वर्ष दिलीप बेंद्रे पाटील, एक वर्ष उपसभापती प्रेमराव देशमुख यांच्याकडे प्रभार, तर सलग चार वर्षे शेख कौसर शेख अख्तर यांनी सभापतीपद सांभाळले. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकाकडे बाजार समितीचा कारभार होता.
अकरा वर्ष अवचित पवार यांच्या सभापती पदाचा प्रदीर्घ काळ बाजार समितीने अनुभवला. यंदा प्रथमच बाजार समिती क्षेत्रातील शेतकऱ्यांना निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आहे. मात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. याआधी विविध कार्यकारी संस्था व ग्रामपंचायत गटातील मतदारांना निवडणूक लढविण्याची संधी होती. या बदलामुळे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे.
१८ जागांसाठी १९० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. नाईक बंगल्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. विरोधकांकडे फारशी गर्दी नसली तरी बाजार समितीच्या गैरकारभारावर बोट ठेवत शेतकऱ्यांमधील नाराजीचा प्रश्न हाती घेऊन विरोधकांनी निवडणुकीची तयारी चालविली आहे.
माजी मंत्री (Former Minister) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते मनोहर नाईक (Manohar Naik) यांची सहकार क्षेत्रातील पकड अजूनही कायम आहे. नुकत्याच झालेल्या शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग व खरेदी विक्री संघ या संस्थांमध्ये नाईक यांचे वर्चस्व सिद्ध झाले. जिनिंग प्रेसिंगमध्ये अध्यक्षपदी नाईक पॅनलचे विजयराव भोपासिंग चव्हाण तर खविसं मध्ये धनंजय डुबेवार अध्यक्षपदी बिनविरोध आरूढ झाले आहे. सहकार क्षेत्रातील हीच वर्चस्वाची परंपरा पुसद (Pusad) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पहावयास मिळेल का याबद्दल उत्सुकता आहे.
या निवडणुकीत (Election) १८ पैकी ११ संचालक विविध कार्यकारी सोसायटी गटातील आहेत. त्यापैकी सात सर्वसाधारण, दोन महिला, एक ओबीसी, एक व्हिजेएनटी असे प्रवर्ग आहेत. ग्रामपंचायत (Grampanchayat) गटात चार संचालक निवडून द्यावयाचे आहेत. त्यापैकी दोन सर्वसाधारण, एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व एक एससी, एसटी सदस्य प्रवर्गातील राहणार आहे. दोन संचालक व्यापारी व अडते गटातून तर एक संचालक हमाल गटातून अशी वर्गवारी आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.