Third DPC Meeting : अकोला जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा आता होणार आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर सभा घेण्याचा मुहूर्त अखेर सापडला आहे. त्यातही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने ही सभा घेणार आहे.
विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ही सभा शनिवारी (ता. 6) सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे. सभेमुळे गेल्या 11 महिन्यांपासून रखडलेली जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील ही केवळ तिसरी सभा आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. नव्या सरकारच्या काळात अकोला जिल्ह्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री मिळाले. त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा होत्या. फडणवीस यांच्याकडेही विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकत्व होते. त्यामुळे अकोला जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.
फडणवीस यांच्या कार्यकाळात अकोला जिल्हा नियोजन समितीची पहिली सभा 7 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडली. फडणवीस हे सभेला स्वतः उपस्थित होते. अशातच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने बैठकीत धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. केवळ आढाव्यांवर बैठक आटोपली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालकमंत्री कार्यकाळात जानेवारी 2023 मध्ये पुन्हा सभा घेण्यात आली. या सभेत फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सभा पार पाडली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ऑक्टोबर महिन्यात राज्यात नव्याने पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले पालकत्व राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आले. अकोला जिल्ह्यासाठी हा निर्णय म्हणजे ‘आगीतून निघाले आणि फोफाट्यात पडले’ असाच होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीची दोन वर्षांतील ही तिसरी सभा होणार आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच सभा आहे. परंतु तेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सभा घेणार आहेत. यापूर्वीच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, अनुपालन, सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना यासंबंधी मार्च 2023 अखेरील डीपीसी खर्चास मंजुरी, पुढील वर्षातील प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, डिसेंबरअखेर खर्चाचा आढावा व त्याला मान्यता, पुनर्विनियोजनास मान्यता आदी विषयांवर निर्णय होणार आहेत.
सोमवारीच (ता. 8) दुपारी दीड वाजता उपमुख्यमंत्री तथा नियोजनमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सने योजना आराखड्याचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यामुळे हा दिवस प्रशासनासाठी ‘व्हीसी’मय ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.