Lok Sabha Election 20124 : प्रकाश यशवंत आंबेडकर हे बाळासाहेब आंबेडकर या नावाने लोकप्रिय आहेत. प्रकाश आंबेडकर राज्यासह देशाच्या राजकारणात मोठे नाव आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. 1994 पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी चार जुलै 1994 रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक भाग होता. (Latest Marathi News)
1993-94 च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबवला आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज संस्थेच्या राजकारणात कायमचा प्रभाव निर्माण केला. त्यानंतर 1995 च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सहभागी करून घेऊन भारिप-बहुजन महासंघाची मोट बांधली.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून अठरापगड जातींना एकत्र बांधत, अकोला जिल्ह्यात सत्तेचा मार्ग यशस्वी चालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग या प्रयोगाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात 'अकोला पॅटर्न’ या नावाने झाली. ‘अकोला पॅटर्न’ने 1990 ते 2004 पर्यंत सुवर्णकाळ अनुभवला. ‘भारिप-बहुजन महासंघ’ या नावाने यशस्वी झालेल्या ‘अकोला पॅटर्न’ला पुढील काळात भव्यदिव्य असे यश मिळाले नसले तरी, विधानसभेत प्रतिनिधित्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारिप-बमसंचा व आताच्या वंचित बहुजन आघाडीचा झेंडा कायम राहिला.
आता विधानसभेवर प्रतिनिधित्व नसले तरी अनेक ठिकाणी सत्तेची समीकरणे बदलविण्याची आणि बिघडविण्याची ताकद ‘अकोला पॅटर्न’ने निर्माण केली आहे, हे त्यांनी मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले. प्रकाश आंबेडकर हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते भारिप-बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली.
भारिप-बमसं आणि आताची वंचित बहुजन आघाडीची कारकीर्द चांगली राहिली आहे. पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभांवरील आतापर्यंत निवडून आलेले उमेदवार दमदार राहिले आहेत. 2014 मध्ये तेराव्या विधानसभेवर एक सदस्य निवडून गेला होता. बळीराम सिरस्कार (बाळापूर) हे ते नाव. 2009 मध्ये बाराव्या विधानसभेत हरिदास पंढरी भदे अकोला पूर्व मतदारसंघातून विजयी झाले. 2004 मध्ये अकराव्या विधानसभेवर एक सदस्य विजयी झाले. हरिदास पंढरी भदे हे बोरगाव मंजू मतदारसंघातून यशस्वी झाले. 1999 मध्ये दहाव्या विधानसभेवर पक्षाचे तीन सदस्य निवडून गेले होते. रामदास मणिराम बोडखे (अकोट), दशरथ मोतीराम भांडे (बोरगाव मंजू) आणि वसंत धोडा सूर्यवंशी (साक्री) यांचा यात समावेश होता.
प्रकाश उपाख्य बाळासाहेब यशवंत आंबेडकर
10 मे 1954
प्रकाश आंबेडकर 1972 मध्ये मुंबईतील सेंट स्टॅनिसलायस हायस्कूलमधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1978 मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी. ए. केले. पुढे 1981 मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयामधून एलएलबी पदवी मिळवली.
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीराबाई आंबेडकर. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहीण आहे. भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह 27 नोव्हेंबर 1993 रोजी अंजली मायदेव यांच्याशी झाला. त्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दाम्पत्याला सुजात हा एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यामध्ये त्यांच्या पत्नी अंजली मायदेव आणि मुलगा सुजात हे मदत करीत असतात.
प्रकाश आंबेडकर हे व्यवसायाने वकील आहेत. ते अकोला वकील संघाचे सदस्य आहेत. त्यांनी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आहे.
अकोला. त्यांनी 2019 मध्ये सोलापूर आणि अकोला या दोन मतदारसंघात निवडणूक लढवली होती.
वंचित बहुजन आघाडी
प्रकाश आंबेडकर यांनी राज्यासह देशाच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आताच्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेचे दोन वेळा तर राज्यसभेचे एक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. राजकीय वाटचालीसाठी आंबेडकरांनी अकोला जिल्ह्याची निवड केली. 1984 मध्ये ते अकोल्यातून पहिल्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरले. मात्र काँग्रेसच्या मधुसूदन आत्माराम वैराळे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 1989 मधील निवडणुकीत भाजपच्या पांडुरंग फुंडकरांकडून आंबेडकरांचा पराभव झाला. 1990 मध्ये राष्ट्रपती कोट्यातून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर संधी दिली गेली अन् ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 1991 आणि 1996 या वर्षात अकोल्यामधून लोकसभेची निवडणूक लढविली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 1998 मधील निवडणुकीत शरद पवार यांनी दलित नेत्यांना सोबत घेऊन एक राजकीय समीकरण जुळवले. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि यातून हे सर्व जण लोकसभेवर निवडून गेले.
पुढे 1999 मध्ये पुन्हा एकदा भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आठ हजार मतांनी विजयी झाले. मात्र त्यानंतरच्या 2004, 2009, 2014 आणि 2019 या चारही लोकसभा निवडणुकांमध्ये आंबेडकर विजयी होऊ शकले नाहीत. राजकारणात विविध विषयांवर ठोस मते व्यक्त करीत वैचारिक भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून ओळख निर्माण केली आहे..
प्रकाश आंबेडकर यांनी मनुवादी प्रवृत्तीविरोधात सातत्याने लढा दिला आहे. दलित, बहुजन समाजातील तरुणाईसाठी रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा दिला आहे. संविधान बचाव मोहीम राबविली. समाजातील आर्थिक कमकुवत लोकांना त्यांनी मदत केली आहे.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. दोन्ही मतदारसंघांत त्यांना पराभव पत्करावा लागला.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी त्यांचा पराभव केला. आंबेडकरांनी आतापर्यंत सलग दहा वेळा या मतदारसंघातून आपले भाग्य आजमावले आहे. यात केवळ दोनदा ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकू शकले आहेत. 1998 आणि 1999 च्या निवडणुकीत आंबेडकर येथून काँग्रेसशी आघाडी केल्यावरच विजयी झाले होते. 2019 मध्ये ते एमआयएमशी युती करून निवडणूक लढले. मात्र एमआयएमचा फारसा फायदा त्यांना झाला नाही.
काँग्रेससोबत आंबेडकर यांची आघाडी न झाल्याने काँग्रेसची परंपरागत मते आंबेडकरांना मिळाली नाहीत. याशिवाय काँग्रेसकडून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. हिदायत पटेल हे सहकारनेता म्हणून ओळखले जातात. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात मुस्लिम समाजातील उमेदवार दिला. त्यामुळे काँग्रेसच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. त्याचा मोठा फटका आंबेडकर यांना बसला.
काँग्रेससोबतच्या आघाडीवरच आंबेडकरांचे या मतदारसंघातील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीवरून लक्षात येते. प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असताना विजयी झाले आहेत. आघाडी झाली तर त्यांना दलित, ओबीसी व अन्य छोट्या समाजघटकांसह मुस्लिमांचेही मतदान मिळू शकते. सोलापुरातही त्यांचा पराभव झाला. बाहेरचे म्हणून मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही, मात्र त्यांना एक लाख 58 जार मते मिळाली होती.
१९८९ पासून प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात सातत्याने निवडणूक लढवीत आहेत. २०१९ मध्ये झालेल्या पराभवाच्या गर्तेतून आंबेडकर लगेच बाहेर पडले. लोकांच्या भेटीगाठी, जनसंपर्क, धार्मिक, सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग हा पूर्वीपेक्षा अधिक वाढला. ग्रामीण व शहरी भागातून आंबेडकर यांच्याकडे आपल्या समस्या, कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या तसूभरही कमी झाली नाही.
देशासह राज्यातील एक मोठे नेते असताना देखील आंबेडकर हे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार व त्यांच्या कुटुंबाची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. याशिवाय एखाद्या मतदाराच्या घरी दुःखद घटना घडली तर प्रत्यक्ष भेट घेण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न असतो. मतदारसंघातील ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना वेळेवर उपचार व वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी आंबेडकर यांचा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तत्पर असतात. या माध्यमातून ते अनेक गरजूंना वैद्यकीय मदत करतात.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे, राजकीय टीकाटिप्पणी, भाषणे, मेळावे आदींची माहिती आंबेडकर हे आपल्या सोशल मीडिया हॅंडलवरून देत असतात. याशिवाय त्यांच्या पक्षाचेही अधिकृत सोशल मीडिया हँडल आहे. देशासह राज्यातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबूक पेज आणि ट्विटर हॅंडलवर पोस्ट केल्या जातात. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला आंबेडकर वैयक्तिक ओळखतात.
देशासह राज्यात प्रकाश आंबेडकर यांचे मोठे राजकीय वलय आहे. वंचित बहुजन आघाडीच्या बांधणीचा धडाका व वंचित बहुजन आघाडीच्या सभांनी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत 42 लाख मतदार वंचितच्या बाजूने उभे राहिले. राज्यातील एक मोठी ताकद म्हणून 'वंचित' पुढे आली. विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उभे असलेल्या वंचितने 24 लाख मते घेतली. अकोल्यात दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी धम्मचक्र मेळावा असतो. राज्याच्या समाजकारण व राजकारणावर ते भाष्य करतात. अलीकडे त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. निवडणूक जवळ आली की दंगली घडतील, असे विधान त्यांनी केले आहे. इंडिया आघाडीच्या समावेशावरून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
याबद्दल स्पष्टता नाही, परंतु ते भारतीय संविधानाला सर्वोच्च मानतात.
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे देशासह राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वलय आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारी 2018 रोजी 'महाराष्ट्र बंद'चे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरुणवर्ग त्यांचा समर्थक बनला आहे. जिल्ह्यासह राज्यात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्याने समाजात त्यांच्याबद्दल कायम आदर आहे. आंबेडकर हेदेखील थोरा-मोठ्यांबद्दल नेहमीच आदरभाव बाळगतात. आंबेडकर यांचे अनेक राजकीय कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक विषयात आपल्या पक्षाच्या माध्यमातून नेहमी आर्थिक मदत करीत असतात.
अकोला लोकसभेतून निवडून जाण्याचे आंबेडकरांचे स्वप्न संभाव्य आघाडीवरच अवलंबून असल्याचे बोलले जाते. याआधी 1998 आणि 1999 मधील निवडणुकीत आंबेडकर येथून काँग्रेसशी आघाडी केल्यावरच विजयी झाले होते. काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य आघाडीवर या मतदारसंघातील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. कारण प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी युती असताना विजयी झाले आहेत. आघाडी झाली तर त्यांना त्यांच्या हक्काच्या दलित, ओबीसी, छोट्या समाजघटकांसह मुस्लिमांचेही मतदान मिळू शकेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अकोला मतदारसंघात लढणार असल्याची घोषणा केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.