नागपूर : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीतून (Coal Mine) दोन ट्रक भरून कोळसा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. एमएसएफ जवानांच्या सतर्कतेने ही बाब उजेडात आली. आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा केली असता, अशा प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्यास चक्क नकार दिला.
आज नागपुरात (Nagpur) असताना पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी नागपुरातील वेकोलिच्या (WCL) मुख्यालयात भेट दिली. ही ‘भेट’ झाल्यामुळे तर त्यांनी पत्रकारांच्या या प्रश्नाला बगल दिली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. उल्लेखनीय म्हणजे वेकोलिच्या खाणीतून कोळसा उचलणारा ठेकेदारच या प्रकरणात संशयित असल्याचे सांगितले जात आहे. ५००० कोटी रुपयांचा हा ठेका असल्याचीही माहिती आहे. ठेकेदाराने चोरी करणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे. या प्रकरणात १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.
अशा गंभीर प्रश्नावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी चुप्पी साधली असली तरी त्यांची ही चुप्पी बरेच काही बोलून जाते. या घटनेमुळे कोळशाची वेकोलिचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोळसा तस्करांनी दोन ट्रक कोळसा चोरला खरा, पण त्या ट्रक्समध्ये कोळसा भरणारी लोडर मशीन कुणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे उत्तर संबंधित ठेकेदारच देऊ शकतो. परिसरातील कोळसा खाण प्रकल्प अशा तस्करांमुळे बदनाम होत आहेत. त्याला भ्रष्टाचाराचे ग्रहण कुणी लावले, याचे उत्तर शोधण्याची वेळ आता आली आहे.
खाणींतील चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी व्हिजिलंस विभागावर आहे. पण हा विभागसुद्धा या चोऱ्यांमध्ये लिप्त तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण काही वर्षांपूर्वी काटा घरावरून होणारी कोळसा चोरी उघडकीस आली होती. १२ चाकी ट्रकची फक्त १० चाकेच काट्यावर चढवली जात होती. ती चोरी पकडल्यावरसुद्धा सर्वांनी हात वर केले होते. याहीवेळी असेच काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणे आवश्यक होते. पण त्यांनी याबाबतचा प्रश्न सपशेल टाळल्यामुळे या चोरीचे तार अगदी वरपर्यंत तर जुळले नाहीत ना, अशीही शंका येत आहे. कोळसा तस्करांना वरून ताकद दिल्याशिवाय ते अशी हिंमत करणार नाहीत, अशीही चर्चा वेकोलित दबक्या आवाजात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.