

Nagpur News: नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. बुटीबोरी नगपालिकेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असलेल्या एबी फॉर्म दिला तर वाडी नगरपालिकेत भाजपचा उमेदवार राहिलेल्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यावर काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हिंगणा तालुक्यातील बुटीबोरी आणि डिगडोह या पालिकेत पंजा गोठवण्यात आला असल्याने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ कारवाई करावी असे सांगून माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकर तसेच माजी प्रदेश सचिव मुजीब पठाण यांनी केदारांच्या विरोधात दिल्लीत जाऊन तळ ठोकू असा इशारा दिला आहे.
नगरपालिका आणि नगराध्यक्षासाठी सोमवारी उमेदवारी दाखल करायचा शेवटचा दिवस होता. उमेदवारांची नावे समोर येताच काँग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना धक्का बसला. तत्पूर्वी याची कल्पना आल्याने काहींनी कालपरवाच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
ग्रामीण भागातील सर्व सूत्रे केदार यांच्याकडे पक्षाने सोपवली होती. त्यांनी यापूर्वी निवड मंडळाला डावलून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ही बैठक सपकाळ यांनी अवैध ठरवली होती. त्यानंतर पुन्हा मुलाखतींसाठी बैठक बोलावण्यात आली होती. यामुळे सर्व काही सुतळीत होईल, एकाच गटाची दादागिरी चालणार नाही अशी आशा काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र या उलट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
बुटीबोरी नगराध्यक्ष पदासाठी केदारांनी निवडलेल्या उमेदवार संघाचा कार्यकर्ता असल्याचा दावा केदारांच्या विरोधकांचा आहे. या नगर पालिकेत नगरसेवकाच्या एका जागेवर काँग्रेसकडून (Congress) लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्याला एबी फॉर्म न देता भाजपच्या कार्यकर्ता राहिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला.
इतरही ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आले, बाहेरून आलेला लोकांना उमेदवारी दिल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे कामठी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शाजाभाई अन्सारी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
मौदा नगरपालिकेत नगराध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या काँग्रेसच्या राजाभाऊ तिडके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रामटेक नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष दामोदर धोपटे यांना डावलण्यात आले. त्यांच्या ऐवजी शिवसेना आणि प्रहार संघटनेचे काम करणाऱ्याला उमेदवार केले.
वाडी नगरपरिषदेतील काँग्रेसच्या अध्यक्षांना डावलण्यात आले. येथून भाजपकडून निवडणूक जिंकलेल्या व तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्याला उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश कोकाटे, शैलेश थोराने यांनासुद्धा कॉंग्रेसने उमेदवारी नाकारण्यात आली असल्याचे समोर आले आहे. बँक घोटाळ्यातून वाचण्यासाठी केदारांनी भाजपची सुपारी घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.