अफवांचा बाजार गरम : भाजपचा एकही नगरसेवक अद्याप भोयरांसाठी पुढे आला नाही…

भोयर (Dr. Ravindra Bhoyar) यांच्यावतीने भाजपच्या (BJP) काही नगरसेवकांना ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे हा भाजपचाच गेम प्लॅन (Game Plan) आहे.
Chandrashekhar Bawankule and Chotu Bhoyar
Chandrashekhar Bawankule and Chotu BhoyarSarkarnama

नागपूर : विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक व कट्टर स्वयंसेवक राहिलेले डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर (Chotu Bhoyar) कॉंग्रेसमध्ये (Congress) डेरेदाखल होऊन मैदानात उतरले. महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह एक माजी आमदार आणि महापालिकेचा एक माजी पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे. दहा ते बारा नगरसेवक ते फोडतील, असे दावे केले जात होते. मात्र अद्याप भोयर यांच्या समर्थनार्थ भाजपचा एकही नगरसेवक वा पदाधिकारी उघडपणे समोर आला नाही.

छोटू भोयर एकटे नाहीत, असे सुरुवातीला बोलले जात होते. तर ही काँग्रेसची स्ट्रॅटिजी आहे. थेट मतदानाच्या दिवशी भाजपला धक्का बसेल, असे दावे भोयर समर्थक आता करीत आहेत. भोयर यांच्यावतीने भाजपच्या काही नगरसेवकांना ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे हा भाजपचाच गेम प्लॅन आहे. आपला उमेदवार काँग्रेसच्या गोटात धाडला, अशा अफवाही पसरल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होणारी विधान परिषदेची निवडणूक आता कुणालाच सोपी राहिलेली नाही. मूळचे भाजप आणि संघ स्वयंसेवक असलेले डॉ. रवींद्र भोयर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिल्याने अफवांचा बाजार चांगलाच गरम झाला आहे. मात्र, कोण कुणाचा हिशेब चुकता करणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भोयर यांना भारतीय जनता पक्षानेच कॉंग्रेसच्या गोटात पाठविले, भोयर भाजप नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करणार, अशा अफवा पसरल्या आहेत.

विधान परिषदेत भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची थेट लढत रवींद्र भोयर यांच्याशी होत आहे. भाजपने त्यांना उपमहापौर केले होते. कार्यकारी महापौर म्हणूनही त्यांनी सहा महिने महापालिकेचा कार्यभार बघितला. नागपूर सुधार प्रन्यासचे ते तीन वर्षे विश्वस्तसुद्धा होते. त्यामुळे ते अचानक काँग्रेसमध्ये जाण्याचे कारण काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित केला जात आहे.

Chandrashekhar Bawankule and Chotu Bhoyar
बावनकुळे संतापले; म्हणाले... तर आम्ही सरकारला सोडणार नाही !

भोयर हे नितीन गडकरी यांचे विश्वासू होते. नागपूर सुधार प्रन्यासवर विश्वस्त म्हणून त्यांनीच भोयर यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे ते भाजप सोडतील, असे कोणालाच वाटत नव्हते. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी ती लढण्याचा इरादा जाहीर केला होता. ते उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि शेवटच्या दिवशी माघार घेतील, अशीच अटकळ सर्व बांधत होते. भोयर यांचा फटकळ आणि मिस्कील स्वभाव बघता हा दबाबतंत्राचा भाग असावा, असेच सर्वांना वाटत होते. मात्र, त्यांनी थेट काँग्रेसची उमेदवारी घेऊन सर्वांनाच धक्का दिला.

नाराजी आणि संशयकल्लोळ..

संख्याबळ जास्त असल्याने भाजपला धोका नसल्याचे बोलले जात असले तरी ‘भोयर फॅक्टर’चा धसका काही प्रमाणात तरी भाजपने घेतल्याचे दिसते. दुसरीकडे कॉंग्रेसमधूनही नाराजीचे सूर उमटले. महत्वाच्या लढाईत खंदा कार्यकर्ता न मिळणे, हेसुध्दा एक प्रकारचे अपयशच असल्याच्या भावना कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत असल्याच्या चर्चाही आहेत. एकुणच ही निवडणूक अफवा आणि संशयकल्लोळाच्या भोवती फिरत असल्याचे दिसून येते. निकाल हाती येईपर्यंत हे सर्व असंच सुरू राहणार, असं दिसतंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com