Shivsena & BJP Political News: कोणत्याही पक्षाचा आधार हा कार्यकर्ता असतो. कार्यकर्त्याला अडचण आली तर नेते त्याच्या मदतीसाठी धावून जातात. अशात काहीही होत नसल्याने अनेकांनी शब्दरूपात आपली नाराजी व्यक्त करणे सुरू केले आहे. भंडारा येथे महायुतीच्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांच्या कुपोषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम न मिळाल्याने दोन नेत्यांच्या चर्चेतून ही नाराजी पुढे आली आहे. त्यामुळे समन्वयाच्या या मेळाव्यात उदासीनता बघायला मिळत आहे. महायुतीच्या पहिल्याच समन्वय मेळाव्यात सर्व मित्रपक्ष आणि घटकपक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
सर्वच पक्षांनी समन्वय ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. त्यातून महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या गेल्या. मात्र मंचावरील काही नेत्यांनी मित्रपक्षांकडून मिळणाऱ्या सापत्नपणाचा मुद्दा मांडला.
मेळाव्यात झालेल्या भाषणात एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाषणात चिमटे काढले. एकट्याच्या बळावर निवडणूक लढता येत नाही. कार्यकर्त्यांचा वापर निवडणुकीपुरता होऊ नये. देण्याची वेळ आली की, नेते पाठ फिरवतात.
भाषणाने पोट भरण्याचे दिवस गेले. घर चालविण्यासाठी कार्यकर्त्यांना रेशनचीही गरज असते, असे नमूद करीत त्यांनी कार्यकर्त्यांचे समर्थन केले. आमदार भोंडेकरांच्या भाषणावर माजी मंत्री डॉ. परिणय फुके म्हणाले, 700 कोटी रुपयांची कामे तुम्हीच आणली, तरी कार्यकर्ते उपाशी आणि कुपोषित कसे राहिले, हे तुम्हीच सांगावे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या कार्यकर्त्यांना कामाची आस नसते. काम, पैसे, टीका याची तमा नसते. सन्मान द्या, आमचा कार्यकर्ता विधानसभेतही काम करेल, असा पलटवारही केला. महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी मंचावरील उपस्थित सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कोरेमोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे आणि प्रदेश महासचिव धनंजय दलाल, शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल गायधने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनमोल गजभिये, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी, महासचिव हिमांशू मेंढे या सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या.
महायुतीच्या धर्माचे पालन करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले खरे. मात्र मंचावरील काही नेत्यांनी मित्रपक्षाकडून मिळणाऱ्या सापत्नपणाचा मुद्दा मांडला. त्यामुळे समन्वयाच्या निर्धाराच्या घोषणातही विसंवादाचा सूर उमटल्याचे जाणवले. त्यामुळे आगामी काळात भंडारा जिल्ह्यातील महायुतीमध्ये संवाद राहणार की विसंवाद निर्माण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.