Gonditola Gram Panchayat : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोंडीटोला ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या सरपंचपदी निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. अतिक्रमणामुळे सदस्यावर असलेला अपात्रतेचा पाश मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाने दूर केला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे 15 जानेवारीला सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्णत्वास येणार आहे. शीतल चिंचखेडे या सरपंचपदावर विराजमान होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अनेक महिन्यांपासून गोंडीटोला ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त असल्याने कामे खोळंबली होती. आता पूर्णवेळ सरपंच मिळणार असल्याने विकासकामांना गती मिळणार आहे. गावात सरपंचपद निवड प्रक्रिया मार्गी लागल्याने आनंद व्यक्त केला आहे.
जानेवारी 2021 मध्ये गोंडीटोला ग्रामपंचायतची निवडणूक घेण्यात आली. अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यांसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात झाले. गट ग्रामपंचायत असल्याने थेट सरपंचपद निवडणुकीची संधी या गावाला मिळाली नाही. सदस्यपदातून सरपंचपद निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणात सरपंच आणि अन्य दोन सदस्य पदमुक्त झालेत. त्यांनी अपर आयुक्तांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली.
नागपूर खंडपीठाने 8 डिसेंबरला घेण्यात येणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली. 19 डिसेंबरला नागपूर खंडपीठात न्यायाधीश अविनाश घारोटे यांनी सुनावणी घेतल्यानंतर 20 डिसेंबरला याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली होती. नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळल्यानंतर सरपंचपद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. परंतु सरपंचपद निवडणुकीला विलंब होत असल्याने गावांतील विकासकामे प्रभावित झाली. त्यामुळे गावकऱ्यांनी सरपंचपद निवड प्रक्रिया राबविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यासंदर्भात माजी उपसरपंच हिरालाल शहारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. अखेर सरपंचपद निवडप्रक्रियेचा मुहूर्त 15 जानेवारीचा निघाला आहे. निवडणूक कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी घटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातसदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये तीन सदस्य पदमुक्त करण्यात आल्यानंतर चार सदस्य बहुमतात प्रशासकीय कारभार करीत होते. यात अनुसूचित जाती राखीव जागेवरून निवडून आलेला एक सदस्य कार्यरत आहे.
सरपंचपद याच प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने याच सदस्यांची वर्णी लागणार आहे. अनिल राऊत, प्रकाश राहगडाले, वैशाली पटले आणि शीतल चिंचखेडे असे चार सदस्य गावात आहेत. या सदस्यांत सरपंचपदाच्या एकमेव दावेदार शीतल रंजित चिंचखेडे आहेत. सरपंचपद निवड प्रक्रियेचा मुहूर्त निघाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.