नागपूर : संघटनेचा पाया मजबूत असणं, हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद म्हणजे पक्षाचे संघटन आहे. त्यासाठीच पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on Amruta Fadnavis News)
काल सायंकाळी खासदार राऊत (Sanjay Raut) यांचे उपराजधानीत (Nagpur) आगमन झाले. विमानतळावर शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ईडीच्या कारवायांबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकण्याचा विक्रम केलेला आहे. पण संपूर्ण भारत देश सोडून केवळ महाराष्ट्र (Maharashtra) आणि पश्चिम बंगालमध्येच ईडीने जोर लावला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत आहेत. हे सर्वांना माहिती आहेच. यातून काय बोध घ्यायचा, तो जनता घेईलच, असे ते म्हणाले.
नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूरकरांना मुंबई प्रिय आहे, तर आम्हा लोकांना नागपूर प्रिय आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करावे, असे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्वच खासदार विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानासाठी निघालेले आहेत आणि मी नागपुरात आलो. नागपूर हे मध्यवर्ती शहर आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भावर लक्ष ठेवण्यासाठी मी नागपुरात थांबणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पक्षाचं जे संघटन आहे, ते अधिक वाढावं, यासाठी काम करत आहोत, असे खासदार राऊत म्हणाले.
येणाऱ्या महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, यासाठी हे शिवसंपर्क अभियान आहे. आज आमचे सर्व खासदार सर्व जिल्ह्यात पोहोचलेले आहेत. मुंबई, ठाणे आदी भागांतून २०-२० कार्यकर्त्यांची टीम त्यांच्यासोबत आहे आणि चार दिवसांनंतर आम्ही सर्व खासदार मुंबईत एकत्र होऊ आणि आमच्या दोऱ्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत येत आहेत, तर त्यांनी नागपुरातील सावजीचा आस्वाद घ्यावा, असे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी म्हटले होते. त्यावर वहिनीसाहेबांचा आग्रह पाळू, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तास काम करत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे, मोदी साहेब काम करत आहेत. कामंही भरपूर आहेत. पण उरलेले २ तासही त्यांना झोपू द्यायचे नाही, असे कदाचित भाजप नेत्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्यानुसार महाराष्ट्रातील भाजपचे नेते कामाला लागले आहेत. त्यांना झोपच येत नाही कारण त्यांची झोप शिवसेनेमुळे उडालेली आहे, असा टोला त्यांनी मारला. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांपेक्षा मी दिल्लीत जास्त राहतो. मोदी १८ तास काम करतात, हे मलाही माहिती आहे. पण त्यांचे महाराष्ट्रातील नेते त्यांना जरा जास्त चढवत आहेत, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.