Khambora Project : अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात येणाऱ्या ६४ गावांना पाणीपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. नियमित पाणी मिळावे, यासाठी या गावांमधील सर्व सरपंच राजकीय मतभेद विसरत आता एकवटले आहेत. ग्रामीण नेत्यांनी आता प्रशासनावर पाणीपुरवठ्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनीही यासाठी पुढाकार घेतलाय.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात खांबोरा पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट गावांतील सरपंच व जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर गंभीरतेनं चर्चा करण्यात आली. (Sarpanch of Villages Included in Khambora Water Supply Scheme of Akola Took Meeting With Shivsena Uddhav Thackeray Groups MLA Nitin Deshmukh & MGP Officials)
विकास पागृत यांनी पाणीपुरवठ्यातील अनियमितता, दिवाळीतही अनेक गावांमध्ये पाणी नव्हते, अनेक ठिकाणी दीड महिन्यातून एखाद्या वेळेस पाणीपुरवठा होतो, धरणात पाण्याचा साठा असताना पाणी मिळत नाही, योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ जिल्हा परिषदेकडे नाही, नवीन मंजूर पाइपलाइन, नूतनीकरणाची कामे ही अर्धवट आहेत, अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटल्याचे सांगितले. बैठकीत या मुद्द्यांवर तात्पुरता तोडगा काढण्यात आला.
जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नवीन पाइपलाइनचे काम राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या परवानगीसाठी थांबले होते असे सांगितले. आता ही परवानगी मिळाली आहे. एक दोन ठिकाणी पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर किमान चार दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्याला महान येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय. या योजनेच्या नूतनीकरणावर केलेला शासनाचा ८० कोटी रुपयां खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळं भविष्यात या योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. वान प्रकल्पातून गावांना पाणीपुरवठा करायचा असल्यास खांबोरा पाणीपुरवठा योजनेतील गावांमधील ग्रामपंचायतींनी तसा ठराव ग्रामसभेत घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतींनी घेतलेले हे ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. खांबोरा योजनेतील सर्वच गावांनी असे ठराव घेतल्यास मागणीला अधिक बळ मिळेल, असं निश्चित करण्यात आलं. बैठकीला सर्वच पक्षांचे सरपंच उपस्थित होते. राहुल कराळे, संजय भांबेरे, पंचायत समिती सदस्य भास्कर अंभोरे, भारत बोरे, नितीन ताथोड, गोपाल इंगळे, जयगोपाल ठाकरे, दिलीप मोहोड, किशोर पाटील हलवने, गंगाधर पाटील इंगळे, आतिष शिरसाट, सतीश टोबरे, सुनील खेळकर, रामेश्वर गोहाडे, शरद ठाकरे, ज्ञानेश्वर जाधव, प्रीतीमेश म्हातूरकर, सुमित तवाडे, गणेश काळमेघ, मनीष वर्गे, रामेश्वर सराटे, कैलास डाबेराव, वासुदेव वक्ते, सारंगधर गावंडे, गजानन बाहकर, रामेश्वर सराटे, कोंडूराम वाघमारे, राहुल तेलगोटे, विठ्ठल काळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यही बैठकीला उपस्थित होते.
कंत्राटी नोकर भरती, योजनेसाठी आवश्यक मनुष्यबळ, वीजपुरवठा आदींबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी २३ नोव्हेंबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला. पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षभेद बाजूला सारत खारपाणपट्ट्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचं जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.