
Vidarbha Political News : सुमारे पंचेवीस वर्षे लाल दिव्याच्या गाडीतून फिरणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांच्यावर संघटना बांधणीची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पडत्या काळात पक्षाला उभारी देण्यासाठी तुतारी फुंकताना त्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येते.
देशमुख १९९५ मध्ये महायुतीच्या सहकारमध्ये सर्वप्रथम मंत्री झाले. त्यावेळी ते काटोल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. याच काळात शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची(NCP) स्थापना केली. त्यांच्यासोबत अनिल देशमुख हे सुद्धा गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच लाभदायक ठरला. आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळापैकी ते १४ वर्षे कॅबिनेट मंत्री होती.
१९१४च्या निवडणुकीत त्यांना प्रथमच पराभवाचा धक्का बसला. त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी त्यांचा पराभव केले. या काळात राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता होती. २०१९च्या निवडणुकीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आशिष देशमुख यांनी तीन वर्षांतच आमदारकीचा राजीनामा दिला. ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी पुन्हा काटोल काबिज केले. भाजप(bjp) आणि शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आले असल्याने पुन्हा युतीची सत्ता येणार असेच चित्र होते.
मात्र उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे देशमुखांचे नशीब पुन्हा फळफळले. त्यांना थेट राज्याचा गृहमंत्री करण्यात आले. येथूनच वादाला सुरुवात झाली. सर्वाधिक प्रसिद्धी त्यांना मिळाली सोबतच तब्बल १४ महिने तुरुंगात घालवावे लागले. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली.
२०२४च्या निवडणुकीत शरद पवार(Sharad Pawar) यांनी त्यांनाच विधानसभा निवडणूक लढण्यास सांगितले होते. त्यांच्याच नावाने एबी फॉर्म जारी करण्यात आला होता. मात्र मुलगा सलील देशमुख यांनी निवडणूक लढण्याचा हट्ट केला. त्यामुळे अनिल देशमुख यांनी माघार घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. प्रफुल पटेल हे सुद्धा अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे सर्वाधिक अनुभवी असल्याने त्यांची विदर्भाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत बुलढाणाचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.