Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेना उद्धव ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामधील नेत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. फूट पडल्यानंतर पक्ष गमाविण्याची टांगती तलवार शरद पवार गटावर आहे. त्यामुळे पक्ष व निवडणुकीचे चिन्ह हातून निसटले तर कोणत्या नावाने व कोणत्याचा चिन्हावर निवडणूक लढवायची असा प्रश्न ‘साहेबांच्या’ शिलेदारांना पडला आहे.
शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्यानंतर यासंदर्भातील लढा कायम आहे. अशात ‘साहेबांचा’ पक्ष ‘दादांच्या’ खिशात गेला तर आपले काय होणार, अशी चिंता आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते व समर्थकांना सतावू लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही त्याचा थेट परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ राज्यातील घरोघरी पोहचविले. पवारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात एका दशापेक्षाही जास्त काळासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर होते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर जे निकष त्यांच्याबाबत लावण्यात आलेत तेच निकष लागले तर, राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था काय होणार? असा प्रश्न नेत्यांना पडला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत तब्बल 40 आमदार ‘साहेबांची’ साथ सोडून महायुतसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. आमदार व खासदांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले. हाच न्याय व निकष राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा न्यायनिवाडा करताना लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मशाल’ प्रज्वलित केली. तेव्हापासून ‘मशाल’ हाती घेऊन शिवसैनिक फिरत आहे. आता लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन होताच निवडणूक आयोगाने मतदार याद्या जाहीर करणे सुरू केले आहे. कदाचित 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीची घोषणा होण्याची दाटा शक्यता आहे. अशात राष्ट्रवादीचा काँग्रेसचा निकाल अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने लागल्यास शरद पवार यांना पक्षाचे नवे नाव व नवे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरावे लागणार आहे. त्याचा मोठा फटका ‘साहेबांच्या’ समर्थकांना निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची राज्यातील महाविकास आघाडी सध्या जागा वाटपावर बैठकसत्र घेत आहे. अशात काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. पक्षीय बलाबल आणि मतदार संघनिहाय प्रभावाचा विचार केल्यासही काँग्रेस सरस ठरण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाच्या ज्या मतदार संघात सर्वाधिक प्रभाव तेथे त्या पक्षाचा उमेदवार असे धोरण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शरद पवार यांच्या गटाला प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता आहे.
अशात पक्ष आणि चिन्हच नसेल तर काही जागांवर पाणी सोडावे लागेल हे देखील शरद पवार गटाला चांगलेच ठाऊक आहे. शरद पवार यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता ते सहजासहजी पराभव मान्य करतील असे वाटत नाही. पक्षातील फुटीनंतर तयार झालेले समीकरण पाहता ‘साहेबां’जवळ एक ‘बॅक अप प्लान’ही तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय लागताच शरद पवार हा ‘प्लान बी’ नक्की वापरतील असे ठामपणे सांगण्यात येत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.