मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली बघायला मिळत आहे. सुमारे ४० आमदारांसह १२ खासदारांनी आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, शिंदे गटात दाखल झालेल्या काही आमदार, खासदार आणि नेत्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मात्र शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पाठिंबा देत आहेत.
शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता खासदार गवळींचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी आज (ता.२८ जुलै) शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी आज 'मातोश्री'वर येत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे गवळी यांना हा धक्का मानला जात आहे. (Prashant Surve & Bhavna Gawli Latest News)
खासदार गवळी आणि सुर्वेंचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर गवळी या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र सुर्वे हे आधीपासूनच राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील उलथापालथ बघता आणि गवळींनी शिंदे गटात केलेला प्रवेशच्या पार्श्वभूमीवर सुर्वेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सुर्वेंनी आज थेट 'मातोश्री' गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. यावेळी ठाकरेंनी सुर्वेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि शिवबंधन बांधले. यामुळे वाशिममध्ये एका नव्या राजकारणाची सुरूवात होत असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुर्वेंनी आपली थोडक्यातच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गवळी ह्या शिंदे गटात दाखल झाल्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मात्र, सध्या त्या वाशिमच्या खासदार असून आमच्यात जे काही नातं होतं ते १० ते १२ वर्षांपूर्वीच संपलं आहे. आता मी आणि माझं कुटुंब वाशिमला राहत असतो. माझ्या सेवेचा मोठा काळ हा दिल्ली आणि मुंबईत गेला आहे. मात्र, मी मूळ वाशिमचा असल्याने आमची शेतीवाडी, व्यवसाय वाशिममध्ये असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुर्वेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने वाशिम मतदारसंघात आता भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांच्यात राजकीय सामना रंगणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबरच शिंदे गटात गेलेले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचेही धाकटे भाऊ व मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गट नेते संजय जाधव यांनी आपल्या खासदार भावाची साथ सोडली आहे. यामुळे जाधवांनीही काल मोठा धक्का बसला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आता सुर्वेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भावना गवळींना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.