
Nagpur News : महायुतीचा धर्म झुगारून भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. यावरून मोठा वाद झाला होता. भोंडेकर आणि आमदार परिणय फुके यांच्यात चांगलीच जुंपली होती.
मात्र, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर यांनी आपली चूक दुरुस्त केली. या निवडणुकीत त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सुबह का भूला श्याम को घर वापस आयो तो उसे भूला नही कहते‘ या उक्तीनुसार सर्वजण झाले गेले विसरले की राजकीय तडजोड केली, अशी चर्चा आता रंगली आहे
गोंदिया मध्यवर्ती सहकारी बँक आणि भंडारा दूध संघाच्या निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी नाना पटोले यांच्यासोबत युती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. फुके यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली याचा विसर भोंडेकर यांना पडल्याचा आरोप केला होता. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मोठे पद दिल्याने त्यांना काही तरी करून दाखवायचे आहे, असा टोलाही लगावला होता. याला भोंडेकर यांनी प्रत्युत्तरात आपल्यासाठी कोणी सभा घेतली नाही, मदत केली नाही असे सांगून आपण स्वबळावर निवडून आलो असल्याचाही दावा केला होता.
यावरून महायुतीमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले होते. भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक नाना पटोले यांनी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भोंडेकरांची येथेही साथ लाभेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. विशेष म्हणजे दूध संघाच्या निवडणुकीत भोंडेकर यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
भंडारा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक 27 जुलैला होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे 21 संचालक मैदानात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल, भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडकर यांच्या नेतृत्वाही ही निवडणूक महायुतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. भोंडेकर प्रथमच महायुतीच्या सहकारी पॅनेलमध्ये सहभागी झाले आहेत.
महायुतीच्या सहकारी पॅनलाकडून कैलाश नशीने, धर्मराव भलावी, सुनील फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोले, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधाने, टीरा तुमसरे, नाना पंचबुधे, कवलजीतसिंह चड्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कपगते, रामदयाल पारधी, अनिल सर्वे, सदानंद बर्डे, जितेश इखर, धर्मेंद्र बोरकर, श्रीकांत वैरागडे हे उमेदवार आहेत.
या सर्वांना माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार नाना पंचबुधे याची साथ लाभणार आहे. हे बघता नाना पटोले आणि भंडारा गोंदियाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.