
Shivajirao Moghe : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मोदींनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घ्यायचे नसल्याने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी लांबविण्यात आल्याची कडवी टीका अखिल भारतीय आदिवासी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज (ता. 4) नागपुरात पत्रकार परिषदेत केली.
शिवाजीराव मोघे म्हणाले, देशात 2014 सालापासून आलेले मोदी सरकार हे शेतकरीविरोधी आहे. 2014 मध्ये मोदींनी यवतमाळात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून 18 आश्वासने दिली. त्यामध्ये शेतकऱ्यांची एकही आत्महत्या होऊ देणार नाही, असे म्हटले होते. मात्र, 10 वर्षांमध्ये 2 हजार 719 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातीलही केवळ 1 हजार 295 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविली. 28 फेब्रुवारीला त्याबाबत ‘ब्र’ही त्यांनी उच्चारला नाही. काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंजाब, हरयाणासह देशभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलकांपुढे ते कायदे मागे घेतले. मात्र, अद्यापही त्यांचे धोरण हे व्यापारधार्जिने असल्याचा आरोप मोघेंनी केला. विशेष म्हणजे, कापूस जेथे पिकतो, तेथे गोदाम, उद्योग देण्याचे आश्वासन फोल ठरले. आजपर्यंत एकही उद्योग येथे आला नाही. सोयाबीन, तूरडाळ यावर निर्यात बंदी लादली. भारतातील नदीजोड प्रकल्पाचाही त्यांना विसर पडला. उलट विकासापेक्षा जाती, धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. देशात हुकूमशाही आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषदेत कॉँग्रेसचे नेते गिरीश पांडव उपस्थित होते. मोघे यांनी सुरुवातीलाच नितीन गडकरी यांचा मुद्दा उपस्थित केला.
देशातील ज्या राज्यात कॉँग्रेसचे सरकार आले, त्या राज्यातील आमदार पळविण्याचे काम मोदींनी केले. त्यासाठी ईडी, सीबीआय मागे लावण्यात येते. राज्यातही काही नेते भाजपमध्ये गेले. त्यांच्या कपाळावरही ईडी आणि सीबीआयची बंदूक ठेवून प्रवेश दिला गेला. दोनदा मुख्यमंत्रिपद भूषविणारे अशोक चव्हाण यांच्या जाण्याचेही हेच कारण असल्याचे शिवाजीराव मोघेंनी ठासून सांगितले. त्यांना पक्षाने वेळोवेळी सन्मान दिला. प्रत्येक निर्णयात ते सहभागी होते. तिकडे गेल्यावर असच बोलल्या जात असल्याचेही यवतमाळचे प्रतिनिधीत्व करणारे मोघे म्हणाले.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर 1952 पासून कॉंग्रेसचा उमेदवार होता. मात्र, काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार तिथे निवडून यायचा. त्यामुळे त्यांनीही दावा केला आहे. इंडिया आघाडीमध्ये जो निर्णय होईल, त्याचा प्रचार आम्ही करू. मी उमेदवार असेल वा नसेल याबाबत पक्ष जे म्हणेल ते मान्य राहील, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.