Vidarbha Political News : राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. या फाटाफुटीमुळे दोन्ही पक्ष निम्मे रिकामे झाले आहेत. दोन्ही पक्षांतील ही फाटाफूट मात्र गेल्या अनेक दिवसांपासून संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण नेत्यांच्या पथ्यावर पडणार आहे. (Young leaders who are waiting for opportunities will get chance)
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड नाराज असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे ४० आमदार आणि अनेक नेते पक्षातून बाहेर पडले. त्यामुळे शिवसेना निम्म्यापेक्षा अधिक, जवळपास पूर्णच रिकामी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नेत्यांचा एक मोठा गट शरद पवारांपासून दूर झाल्याने या पक्षातही मोठा खड्डा पडला आहे. दोन्ही पक्षांतील पहिल्या फळीचे नेते जवळपास गायब झाले आहेत.
आता संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुण नेत्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले तरुण नेते संधीच्या शोधात होते, परंतु प्रस्थापित नेत्यांना ओव्हरटेक करून पुढे कसे जायचे, असा प्रश्न या तरुण नेत्यांपुढे होता. आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाल्याने तरुणांना मोठी संधी प्राप्त झाली आहे.
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवारांजवळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कमतरता नाही. जे नेते सोडून गेले त्यांच्या जागी नवीन तरुण चेहऱ्यांना संधी मिळेल, असे त्या रविवारी (ता. एक) नागपूरला स्पष्टपणे बोलल्या. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातही हीच स्थिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून युवा सेनेचे अध्यक्ष तथा उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नंतरचा सर्वात तरुण चेहरा म्हणून आदित्य यांच्याकडे पाहिले जाते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यानंतर ठाकरे गटात उरलेल्या तरुण आणि नवीन चेहऱ्यांचा शोध आता घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट दुसऱ्या फळीत कार्यरत असलेल्या तरुण नेत्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनेक नेते आपापल्या मुला, मुलींचे पॉलिटिकल लॉन्चिंग करण्याची संधी शोधत होते. राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे आता या तरुण चेहऱ्यांनी राजकीय आखाड्यात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
युवा सेनेचे अध्यक्ष तथा उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नव्या उमेदीच्या अनेक तरुण नेत्यांनी चांगले शक्तिप्रदर्शन केले. त्यातून या दोन्ही गटांतील या तरुण चेहऱ्यांनी पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर आपल्यावर पडावी, यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले. प्रस्थापित नेत्यांची मनं सांभाळून शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आगामी काळात कोणकोणत्या तरुण चेहऱ्यांना संधी देतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.