Central Government : शिक्षणासह विकासाच्या मुख्य प्रवाहात आजतागायत विदर्भातील बहुरूपी ही भटकी जमात आलीच नाही. पिण्याच्या पाण्यासह शिक्षण, घरकुल अशा विविध सुविधा या समाजापर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे घरोघरी जाऊन भिक्षा मागणारे हे कलावंत आपली कैफियत मांडत आता थेट सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढत आहेत. ईडी सरकार म्हणत ते निंदाही करू लागले आहेत. अशाच एका कलावंताचा भिक्षा मागत आणि सरकारवर ताशेरे ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून सरकारला ‘ट्रोल’ करीत आहेत.
रमेश शिंदे असे सरकार विरोधात आगपाखड करणाऱ्या बहुरूपी कलावंताचे नाव आहे. बहुरूपी समाज म्हणून शासनाच्या रेकॉर्डवर या व्यक्तीचा समाज आहे. संपूर्ण विदर्भात हा समाज आढळतो. भटकी जमात म्हणूनही शासनदप्तरी त्यांची नोंद आहे. अतिशय मागास असलेल्या या समाजातील व्यक्ती श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, सीता, रावण, पोलिस अशी वेशभूषा करून ते घरोघरी भिक्षा मागायला जातात. यावेळी ते कुठल्याही घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण होईल, त्यांच्या मुलाबाळांना ईश्वर प्रगतीपथावर नेईल, अशी शब्दफेक करीत कृतज्ञता व्यक्त करतात. तेंव्हा नागरिक, महिला त्यांना पैसे, धान्य, कपडे दान करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अशा दानावरच बहुरुपी व त्यांच्या कुटुंबांची गुजराण चालते. मूळची भटकी असलेली ही जमात मात्र आता विदर्भातील अनेक जिल्ह्यात स्थिरावत असल्याचे चित्र आहे. गावोगावी स्थलांतर करण्यापेक्षा एका ठिकाणी समूहाने स्थिरावून आसपास असलेल्या गावात फिरून त्यांची गुजराण सुरू आहे. रमेश शिंदेही त्यातील एक. त्यांचा समूह यवतमाळ शहरातील भोसा परिसरात सुमारे 40 वर्षांपूर्वी स्थिरावला. रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेवर अतिक्रमण करीत पाल ठोकून राहू लागला. त्यानंतर तत्कालीन भोसा ग्रामपंचायतीने त्यांची नावे मतदार यादीत घेतली. त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र मिळाली. त्याआधारे त्यांनी झोपड्यांमध्ये वीज जोडण्याही मिळविल्या. ग्रामपंचायत त्यांच्याकडून घरगुती कर म्हणजेच घर टॅक्स सुद्धा वसूल करायची.
भोसा ग्रामपंचायत आता यवतमाळ नगर परिषदेत विलीन झाली आहे. तब्बल 40 वर्षे विविध करांचा भरणा करूनही शासनाने कुठलीही सुविधा दिली नाही. पिण्याच्या शुद्ध पाण्यासह, शिक्षण, घरकुल, रोजगाराच्या संधी अशा विविध सुविधा या समाजापर्यंत पोहोचल्याच नाही. त्यामुळेच आजही हा समाज शहरात, गावोगावी भिक्षा मागून आपली गुजराण करतो. निवडणूक आली की विविध पक्षांचे उमेदवार त्यांच्याकडे मत मागण्यासाठी येतात. त्यांच्या विकासाची अनेक आश्वासने देतात. निवडणूक आटोपली की मात्र त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहात नाही. हीच खंत बहुरूपी कलावंत रमेश शिंदे यांच्यासह त्यांच्या समूहातील अनेकांना आहे. त्यातूनच आता या कलावंतांनी थेट सत्ताधाऱ्यांवर आगपाखड सुरू केली आहे.
भिक्षा मागताना विशिष्ट शब्दफेक करीत ते सरकारवर आसूड ओढत आहेत. नव्हेतर त्या माध्यमातून ते नागरिकांत जनजागृती करीत स्वतःच न्यायहक्क पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून नोंद असलेल्या बोथबोडन या गावात बहुरूपी कलावंत रमेश शिंदे भिक्षा मागायला गेले. यावेळी शेतकरी नेते अनुप चव्हाण यांच्याकडे रमेश शिंदे भिक्षा मागायला गेले. यावेळी चव्हाण यांनी शिंदे यांची व्हिडीओ चित्रफीत काढली. समाजभान राखत त्यांनी ही चित्रफीत सोशल मीडियातून व्हायरल केली. एक कलावंत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचतो. सत्ताधाऱ्यांना ईडी सरकार संबोधतो. त्यामुळे हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरल्याने ते सत्ताधाऱ्यांना प्रचंड ट्रोल करीत आहे.
स्वतःला कलावंत समजणाऱ्या बहुरूपी समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक विकास झाला नसला तरी त्यांची शब्दफेक, कलाकृती आणि बाणेदारपनाही वाखाण्याजोगा आहे. भिक्षा मागून ते जीवन व्यतीत करीत असले तरी ते गुन्हेगारी मार्गाला लागले नाहीत. कुणाला भिक्षा मागताना ते त्याच्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा उद्धार होईल, अशी भावना व्यक्त करतात. मात्र रमेश शिंदे यांच्या सरकारविरोधी वक्तव्यातून पहिल्यांदाच बहुरूपी कलावंताने कुणाला जाहीर शिव्याशाप अथवा निषेधात्मक भाषा वापरल्याचा प्रकार पुढे आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.