Chandrapur District Political News : चंद्रपूरची लोकसभा निवडणूक तुम्ही लढणार का, असा प्रश्न पत्रकारांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी तुमचा आक्षेप आहे का, असा प्रतिप्रश्न केला. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, पक्ष जो आदेश देईल, त्याचे पालन करू, असे उत्तर मुनगंटीवारांनी दिले. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढविण्याची मुनगंटीवारांची तयारी असल्याची चर्चा सुरू झाली. (Discussions started about the preparation of Mungantiwars to contest the Lok Sabha elections)
दरम्यान, त्यांच्या विधानानंतर भाजप चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवारांना संधी देणार की, माजी खासदार हंसराज अहीर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविणार, याबाबतही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांना वेळ आहेच. पण आतापासूनच भाजपची मिशन ४८ ची तयारी सुरू झाली आहे. बूथनिहाय कमिट्यांपासून विधानसभा, लोकसभा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सत्तासमीकरणं बघता आपल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील, यासाठीची रणनीती तयार करण्यात आली आहे. मोदी लाट-२ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठं यश मिळाल होतं, पण चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रात त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहीर यांना मात देत विजय मिळविला.
या एका जागेमुळे महाराष्ट्राला कॉँग्रेसमुक्त करण्याचं भाजपचं स्वप्न राहून गेलं होतं. या वेळी मात्र कुठल्याही स्थितीत चंद्रपुरातून भाजपची सीट काढण्यासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे. हंसराज अहीर यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांचे हात मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद दिले. याचा पुरेपूर उपयोग करीत अहीर यांनी दौरे वाढविले आहेत.
आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. विविध पक्षांनी, विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. चंद्रपूर भाजपत अहीर आणि मुनगंटीवार असे दोन गट असल्याचे सर्वश्रुत आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपुरात आले असता, त्यांच्यासमोरच गटबाजीचे उघड प्रदर्शन झाले होते. अशा स्थितीत येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा चंद्रपूर लोकसभेचा उमेदवार कोण असेल, याबाबतची उत्सुकता भाजपच्या दोन्ही गटांत आहे.
सुधीर मुनगंटीवार राज्यातील हेविवेट नेते म्हणून ओळखले जातात. मागील काळात त्यांनी अर्थ मंत्रालयाचा भार उत्तमरीत्या सांभाळला होता. ओबीसींचे अन्नत्याग आंदोलन सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात आले होते. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर फडणवीस परत गेले, यानंतर पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांना विविध प्रश्न विचारले.
तुम्ही लोकसभा निवडणूक लढविणार का, या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच तुमचा काही आक्षेप आहे का, असं विचारलं. पक्ष देईल, ती जबाबदारी आपण पार पाडू, असे सांगत अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. सुधीर मुनगंटीवार यांच्या त्या विधानाने चंद्रपुरातील भाजपचा लोकसभेचा किल्ला कोण लढविणार, याची उत्सुकता भाजपच्या गोटात आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.