

Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray's Vidarbha Tour : योग्य वेळी भाकरी फिरवली असती, तर ही वेळ आली नसती. योग्य वेळी भाकरी फिरवली असती तर कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचा विश्वास कायम राहिला असता. मला आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Before criticizing BJP, they should also reflect on themselves)
आज (ता. ८ जुलै) मंत्री मुनगंटीवार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपवर टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचंही आत्मचिंतन करायला पाहिजे. जर तुमच्या स्वभावामध्ये संघटन कौशल्य असते, आपले कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी टिकवता आले असते आणि ते केले असते, तर अशी वेळ आली नसती. आमच्यावर आरोप करण्याचे काही काम नाही. आम्ही राष्ट्रभक्तीचा राजकारण करतोय. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला होता?
आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दौरे करून काहीच होणार नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त मोदीजींचा विरोध आहे. त्यांनी गेल्या नऊ वर्षांत देशासाठी काय कार्य केले, हे समजू द्या. ते कृषिमंत्री असताना ८० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याचं काय कारण होतं, हे सुद्धा त्यांनी सांगावं. महाराष्ट्राचा दौरा काढून काही होणार नाही. अजून काही लोक संपर्कात आहेत, ते मी लीक करणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
खातेवाटप लवकरच होईल. खातेवाटप झालं नाही म्हणून काम होत नाही असं नाही. आम्ही आहोत काम सुरूच आहे. खाते वाटप झाले आहे. आमच्याकडून काढून इतरांना द्यायचे आहे. उशीर होण्याचे कारण म्हणजे विस्तार व्हायचा आहे, त्यानंतर खाते वाटप होईल.
अनिल पाटील यांच्या स्वागताला विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले. याबाबत विचारले असता, अनिल पाटील यांना विचारून काही त्यांच्या स्वागतासाठी मुलं उभी केली नसतील. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना उभे केले असावे. मात्र यात मंत्र्यांचा काही दोष नाही. जो कोणी अधिकारी कर्मचारी हे करत असेल त्यांनी यापुढे काळजी घ्यावी.
पहिले कोरोनात उद्धव ठाकरे यांनी दौरे केले असते तर कदाचित एकनाथ शिंदे भाजपसोबत आलेच नसते. तेव्हा काही करू शकले नाही. घरी बसले त्यामुळे आता घरी बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. अन् आता त्यांना दौरा करावा लागतो. बच्चू कडूंच्या संदर्भात विचारले असता, ते नाराज नाहीत. ते कधीही म्हणाले नाही की, मी नाराज आहो. मी महाविकास आघाडीतून इकडे आलो आणि मी नाराज आहे, असं त्यांचं वक्तव्य दाखवा, असे मुनगंटीवार म्हणाले.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या संदर्भात प्रश्न केला असता, पंकजा मुंडे यांनी राजकारणातून सुटी घेतली नाही. माझ्या राजकारणाच्या संदर्भात मी दोन महिने आत्मचिंतन करेल, असं त्या बोलल्या. त्यांनी सुटी घेतली म्हणजे काय त्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार नाही, असं अजिबात नाही, याबाबतीत त्यांचे आणि माझं बोलणं झालं आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. अपात्रतेचे निर्देश उद्धव ठाकरेच्या (Uddhav Thackeray) आमदारांनाही देण्यात आले आहेत. नोटीस देऊन टाकल्याने अपात्रता होत नाही. संविधान आणि कायदे आहेत. याचे काही नियम आहेत. उद्या कोणीही नोटीस देऊ शकतो, त्यांच्याकडे पक्षच नाहीये. उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, म्हणत ते एकटेच फिरत आहेत, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.