Akola Constituency : वाढदिवसादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी ‘आमदार’ असा उल्लेख करीत दिलेल्या शुभेच्छांनंतर भाजपचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे नाव अचानक अकोला लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आले आहे. आतापर्यंत विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांचे नाव अग्रस्थानी होते. परंतु अचानक धोत्रे यांच्याऐवजी डॉ. पाटील यांना उमेदवारी मिळाली तर? असे प्रश्न आता मतदारसंघात विचारले जात आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचाक तथा भाजपच्या मुंबईतून आलेल्या काहींनी अकोला लोकसभा मतदारसंघात नुकतीच काहींची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही मोजके पदाधिकारी, भाजपचे जुने जाणकार, प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी, डॉक्टर, व्यावसायिक, अभियंता, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस व महसूल विभागातील काही अधिकारी व काही मतदारांशी या ‘टीम’ने संपर्क केला.
अकोला लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 वर्षांत झालेल्या बदलांची या ‘टीम’ने माहिती घेतली. सर्वसामान्यांना भाजपकडून व विद्यमान खासदारांकडून कोणत्या अपेक्षा होत्या, या अपेक्षा पूर्ण झाल्यात का, विद्यमान खासदार किंवा प्रस्थापित नेते त्या पूर्ण करण्यात सक्षम ठरले नसतील तर आगामी निवडणुकीत कोणते परिणाम होणार, वंचित बहुजन आघाडीचा परिणाम किती दिसणार, काँग्रेसमधून कोण दावेदार असू शकतो, असे अनेक प्रश्न या ‘टीम’कडून विचारण्यात आलेत.
यासोबतच विद्यामान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे की माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यापैकी कोणाला पसंती द्याल, असा थेट प्रश्नच विचारण्यात आला. इतकेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघाची माहितीही घेण्यात आली. अलिकडेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनपेक्षित चेहऱ्यांना नेतृत्व देत धक्कातंत्राचा वापर केला. तसेच तंत्र अगदी अपेक्षित नवा चेहरा आणत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरल्यास कोणत्या परिणामांना तोंड द्यावे लागू शकते, याची चाचपणीही करण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार चारसौ पार’ आणि ‘तिसरी बार फिर मोदी सरकार’ असा नारा दिला आहे. संपूर्ण देशभरातून 400 जागांवर विजय मिळविण्याचे भाजपचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातही ‘45 प्लस’चे लक्ष्य महायुतीने डोळ्यापुढे ठेवले आहे. अशात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजप अगदी सावधगिरी बाळगत आहे. भाजपने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार भाजपजवळ जागांचे समीकरण तयार आहे. त्यानंतरही अशा प्रकारचे सर्वेक्षण पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि संघाशी संबंधित काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे पश्चिम विदर्भातील दौरे वाढले आहेत. अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम या तीनही जिल्ह्यात सध्या हे सर्वेक्षण सुरू आहेत. अकोल्यात तर अनेकांना थेट रणजित पाटील, अनुप धोत्रे की आणखी कुणी असा प्रश्न विचारला जात आहे. बुलढाण्यात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या जागेवर कुणाला भाजपकडून पर्यायी उमेदवार करायचे हे विचारले जात आहे. यवतमाळ-वाशीममध्येही विद्यमान खासदार भावना गवळी यांच्याबाबत पुन्हा चाचपणी केली जात आहे.
सर्वेक्षणानंतर ‘टीम’चे बहुतांश सदस्य अकोला येथे परतल्यावर आपल्याजवळी दररोजचा निष्कर्श त्यांच्या ‘टीम लिडर’ला देत आहेत. मात्र या ‘टीम’चे नेतृत्व नेमके कोण करत आहे संघ की भाजप हे कळू शकले नाही. एकाच वेळी लोकसभा व विधानसभेसाठी सुरू असलेले हे सर्वेक्षण उमेदवाराचे नाव ‘फायनल’ करताना उपयोगी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात अकोल्यात धोत्रे विरोधी गट सक्रिय झाला आणि अनुप धोत्रे यांचे नाव ऐनवेळी कापले गेले तर त्याचे परिणाम कदाचित भाजपला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपच्या अकोला लोकसभा मतदारसंघातील फळीत डॉ. रणजित पाटील समर्थकांची नावे तुलनेने कमी आहे. पक्षाच्या तळागाळापर्यंतही डॉ. पाटील यांचे काम करणारे फारसे नाहीत. पद असतानाही व आता नसतानाही डॉ. पाटील यांचे अलिप्तपण त्यांचे किती प्राबल्य आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम विदर्भात काही निकटवर्तीय आहे. त्यात डॉ. रणजित पाटील यांचे नाव घेतले जाते.
अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळाल्यास व ते विजयी झाल्यास त्यांना केंद्रीयमंत्रिपद मिळणार नाही. त्याचे कारण म्हणजे अनुप धोत्रे विजयी झाले तर ही त्यांची पहिलीच ‘टर्म’ असेल. डॉ. रणजित पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास व ते विजयी झाल्यास त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून किमान एखादे पद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित त्यामुळेच अचानक डॉ. पाटील यांचे नाव चर्चेत आले असावे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.