Lok Sabha Election 2024 : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे कायमच पश्चिम विदर्भातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक राहिले आहेत. अकोला जिल्ह्यात संजय धोत्रे यांनीच भाजपची पाळेमुळे खोलवर रुजवली. संजय धोत्रे यांनी गावागावांत जाऊन कार्यकर्ते पक्षाशी जोडले. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो की विधानसभा, खासदार धोत्रे यांनी केलेले त्याचे नियोजन विजय प्राप्त करून देणारे ठरले. जिल्ह्यात त्यांच्यामुळे काँग्रेसची पीछेहाट झाली. (Latest Marathi News)
प्रकृतीच्या कारणामुळे खासदार संजय धोत्रे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळावी, अशी अकोला जिल्हा भाजपची मागणी आहे. सलद चार टर्मपासून खासदार असणाऱ्या संजय धोत्रे यांच्या मुलाला खासदारकीची उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा आहे.तरीही धोत्रेंचा आणि भाजपचा जिल्ह्यातील नवा राजकीय वारस म्हणून भाजपकडून अनुप धोत्रे यांना अगोदरच ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले आहे.
वडिलांप्रमाणेच उच्चशिक्षित असलेल्या अनुप धोत्रेंनी अकोला लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अनुप धोत्रे यांच्या रूपाने जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा युवा नेता मिळणार आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच कार्यकर्ते जोडण्याची किमया आपसूकच अनुप यांना प्राप्त झाली आहे.
सलग पाचव्यांदा अकोला लोकसभा हा गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपने अनुप यांच्या माध्यमातून रणशिंग फुंकले आहे. बोलण्यात, वागण्यात, जनसंपर्क ठेवण्यात हुबेहूब संजय धोत्रे यांची झलक असल्याने भाजपमधील कार्यकर्ते अनुप धोत्रेंबद्दल कमालीचे आग्रही आहेत. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी पक्ष वाढीसाठी दाखविलेल्या निष्ठेचे फळ त्यांच्या मुलाला म्हणजेच अनुप धोत्रे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या रुपाचे मिळण्याची दाट शक्यता आहे.
अनुप संजय धोत्रे
24 मे 1984
बी.कॉम (सिंबायोसिस महाविद्यालय, पुणे)
अनुप धोत्रे यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. त्यांचे वडील संजय धोत्रे खासदार आहेत. आई सुहासिनी धोत्रे या भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. पत्नी समीक्षा या गृहिणी असून त्यांना तीन अपत्ये आहेत. मोठी मुलगी यशिका आणि दोन जुळे रणविजय आणि राजनंदिनी. अनुप यांचे वडील संजय धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा विजयी झाले आहेत. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे 2024 ची निवडणूक ते लढवणार नाहीत. त्यामुळे अनुप धोत्रे हेच त्यांचे राजकीय वारसदार असतील.
अनुप धोत्रे यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. त्यात अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भू-विकास आदींचा त्यात समावेश आहे.
अकोला
भारतीय जनता पक्ष
अनुप धोत्रे यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. असे असले तरी ते 2024 साठी अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख आहेत. ऑक्टोबर 2023 पासून भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रभारी. अकोला लोकसभा मतदारसंघस्तरीय महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. या शिबिरांतून जवळपास 35 हजार रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध समाज घटकातील गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. 2014 व 2019 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी बूथ, नगर व वार्डस्तरांवर बैठका घेऊन त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करून त्यात मोठ्या प्रमाणात युवकांना सहभागी करून घेतले. 2014 व 2019 लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया वॉररूमच्या माध्यमातून मतदान संपर्क अभियान प्रभावीपणे राबविले. वडील सुरुवातीपासूनच भाजपचे निष्ठावंत आहेत. त्यामुळेच वडिलांचाच वारसा पुढे नेण्याचे काम अनुप धोत्रे करीत आहेत.
प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी (विशेषतः कापूस उत्पादक), अकोला येथील कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव असून त्या माध्यमातूनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. ते अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.
निवडणूक लढविली नाही.
निवडणूक लढवली नव्हती.
अनेक महिन्यांपासून अनुप धोत्रे हे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. या माध्यमातून ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी करीत आहेत. पक्षाच्या बैठका, सभा घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात होत असलेल्या सामाजिक कार्यक्रमांत ते आवर्जून सहभागी होत आहेत. लोकांच्या भेटी, जनसंपर्क, धार्मिक, सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग पूर्वीपेक्षा आता अधिक वाढला आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार व त्याच्या कुटुंबाची इत्थंभूत माहिती संपर्क क्रमांक, पत्त्यासह त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याशिवाय एखाद्या मतदाराच्या घरी दुःखद घटना घडली तर प्रत्यक्ष भेट घेऊन ते त्यांच्या दुःखात सहभागी होतात.
अनुप धोत्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. ट्विटर, फेसबुक, इन्टाग्राम आणि यू-ट्युबरवर ते सक्रिय आहेत. पक्षाची ध्येयधोरणे, नेत्यांची भाषणे, मेळावे, कार्यक्रमांची माहिती अनुप त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देत असतात. जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यावरही ते भाष्य करतात. त्यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट होतात.
अनुप धोत्रे यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात मोठे वाद, चुकीची विधाने असे प्रसंग घडले नाहीत. ते फारसे याबाबत समोर आलेले नाहीत. वडील केंद्रीय राज्यमंत्री असताना देखील ते मीडियापासून दूरच होते.
वडील संजय धोत्रे
वडिलांपासून पक्षनिष्ठा हा गुण अनुप यांनी घेतला आहे व तो जपला आहे. हा त्यांचा सर्वांत मोठा सकारात्मक मुद्दा म्हणावा लागेल. प्रत्येकाच्या सुख-दु:खात मदतीला ते धावून जाता. उच्चशिक्षित असल्याने वडिलांपासून मिळालेल्या राजकीय बाळकडूचा ते सुयोग्य वापर करतात. कार्यकर्ता जोडण्याची कला त्यांन अवगत झाली आहे. शांत आणि संयमी चेहरा, ज्येष्ठांबद्दल आदरभाव त्यांच्यात आहे. जिल्ह्यात अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भाजपशिवाय इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांशी अनुप धोत्रे यांचे संबंध चांगले आहेत.
राजकारणात घराणेशाही वाढत असल्याचे सर्वत्र बोलले जाते. अनुप यांना देखील घराणेशाही मुळेच खासदारकीचे तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या धोत्रे परिवाराची राजकीय घराणेशाही आजही टिकून आहे. अनुप यांनाही त्याचा फायदा झाला आहे. कुणाशी जास्त बोलणे नाही, कामापुरते तेवढेच बोलणे अशी ओळख अनुप यांची आहे. अनुप यांना सर्वकाही वडिलोपार्जित मिळाले आहे. पक्षात आपल्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये, असा सातत्याने प्रयत्न केल्याचा आरोप अनुप यांच्यावर केला जातो. जिल्ह्यातील भाजपमध्ये धोत्रे आणि पाटील असे दोन गट आहेत. यातील धोत्रे गटातील काही नेते आक्रमक असल्याचा आरोप होते. त्यांच्याकडून इतरांना डावलण्यात येत असल्याची टीकाही होते. त्यामुळे अनुप यांच्या नावाला भाजपमधील गटातून विरोधही आहे. या गटबाजीचा फटका भाजपला अनेकदा बसला आहे, बसू शकतो.
अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळावी अशी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. भाजपचा धोत्रे गट जिल्ह्यात अधिक सक्रिय आहे. या गटाच्या समर्थकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे अनुप यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपमधील सक्रिय गट बॅकफूटवर येऊ शकतो. जिल्ह्यात पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. महापालिकेतही भाजपची सत्ता होती. अशात अनुप यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपला काही प्रमाणात फटका बसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.