Sharvari Tupkar Birthday: स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची पत्नी शर्वरी यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने रविकांत तुपकर यांनी फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आंदोलनात पाठिशी खंबीर उभ्या राहणाऱ्या शर्वरी आणि रविकांत यांच्या 'लव्हस्टोरी'वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
"नवरा म्हणून तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही,याची आज कबूली देतो. तुला कधी निवांत फिरायला नेलं नाही, कधी भेटवस्तू दिल्या नाहीत, शांतपणे बसून तुझी चौकशीही केली नाही, या सगळ्या गोष्टींची सल मनात आहे," अशा भावना रविकांत यांनी व्यक्त केली आहे.
तुपकर म्हणतात,"माझी जीवघेणी आंदोलने असोत,आत्मदहनाचा इशारा असो किंवा जलसमाधीचा निर्धार, तू मला कधीच मागे खेचलं नाहीस. मला बळ दिलंस, खंबीर अशी साथ दिलीस. अनेक वेळा आंदोलनात झालेल्या अटकेच्या वेळीही मी तुरुंगात असतांना तू बाहेर मोठ्या हिमतीने किल्ला लढवलास. तुझ्या धैर्याचं, सामर्थ्याचं आणि विवेकबुद्धीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत,"
रविकांत तुपकर आपल्या फेसबूकपोस्टमध्ये लिहितात..
प्रिय शर्वरी,
मी तुला हे असं पत्र लिहितोय याचं तुला आश्चर्य वाटत असेल, कारण भावना व्यक्त करण्यात मी अगदी कच्चा आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे. पण आज लिहावसं वाटतंय, अगदी मनापासून.. निमित्त आहे तुझ्या 23 मार्चच्या वाढदिवसाचं...
एका सुखवस्तू वकील कुटुंबातील तू महत्त्वाकांक्षी मुलगी.. माझ्यासारख्या चळवळीतल्या फकीर कार्यकर्त्याच्या प्रेमात तू कशी पडलीस, हे मला आजही पडलेलं कोडं आहे. नुसतं प्रेमच नाही केलंस तर भौतिक सुखांचा त्याग करून आज इतकी वर्षे आपला संसार यशस्वी केलास. आपली ओळखही कोर्टातलीच.. "कोर्टाची पायरी चढली, आणि लग्नाची बेडी पडली", अशी आपली लव्हस्टोरी...!
तू वकील म्हणून ग्रेट आहेसच, पण एक पत्नी, सून, आई, सहकारी आणि माणूस म्हणून तू सर्वोत्तम आहेस. वेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक आणि सामाजिक वातावरणातून तू आपल्या घरात आलीस आणि बघता बघता किती सहज सगळं आपलंसं करून घेतलंस.. अर्थात तुझ्यासाठी ते सहज नसेलच पण तू कुठल्याच गोष्टीची कधी तक्रार केली नाहीस. मुलांचं संगोपन, त्यांची शाळा, घरातली कामं, अगदी किराणा माल भरण्यापासून कशातच माझा तुला उपयोग होत नाही. घर, मुलं, तुझी वकिली, माझी आंदोलनं, तू सगळं कसं एकहाती सांभाळतेस. ही तारेवरची कसरत कशी जमवतेस, याचं गुपित तुलाच ठाऊक!
माझा लढवय्या स्वभाव तुला अगदी सुरुवातीपासून आवडत आला. त्यामुळे तू स्वतः सगळ्या जबाबदार्या माथ्यावर घेऊन मला समाजकारण आणि राजकारण करण्याची मुभा दिलीस. जेव्हा कधी माझ्यावर संकट येतं तेव्हा माझ्या पाठीशी नाही तर माझ्या पुढे तू ते संकट झेलायला उभी ठाकतेस. नवरा म्हणून तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही,याची आज कबूली देतो. तुला कधी निवांत फिरायला नेलं नाही, कधी भेटवस्तू दिल्या नाहीत, शांतपणे बसून तुझी चौकशीही केली नाही, या सगळ्या गोष्टींची सल मनात आहे. पण तुझ्या मनात याबाबत खंत आहे का हे माहित नाही कारण ती तू कधीच दाखवली नाहीस.
मी तुझ्यासाठी बदलावं हे तुला कदापी सहन होणार नाही. त्यामुळे तुला आवडणारा लढवय्या रविकांत म्हणूनच मी नेहमी तसाच राहीन असा तुला शब्द देतो. मला लहान लेकरासारखं तू आजवर सांभाळत आलीस आणि पुढेही तुझ्या मायेच्या सावलीतच मला रहायला आवडेल. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, तुला उत्तम आरोग्य लाभून भरपूर काम करण्याचे बळ मिळो, हीच आज तुझ्या वाढदिवशी सदिच्छा!
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.