
Buldhana News : नागपूरची दंगल, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या कोरटकरला अटक आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या मिमिक्रीने सध्या राज्यात सर्वत्र गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात गुंतले असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व राजकीय गोंधळात उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने शेतीला पाणी मिळावे, यासाठी स्वतःच्या जीवाचे बलीदान देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयास आर्थिक मदत करून अद्यापही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रत्यय दिला.
विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून याची दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार या नात्याने केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचा अपवाद वगळता कोणी शेतकऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त करायलासुद्धा तयार नसल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आत्मबलिदान दिले होते. त्याने वारंवार शेतीला पाणी सोडावे, यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली होती. आंदोलन केले होते. मात्र, याची कोणीच फारशी गंभीर दखल घेतली नाही. काँग्रेसच्या (Congress) कार्यकाळात विदर्भातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या रोखण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती.
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या कारणामुळे विदर्भातील तुटपुंजे सिंचन असल्याचे एक प्रमुख कारण असल्याचा अहवालही सादर करण्यात आला होता. यासाठी एक पॅकेजही जाहीर केले होते. त्यास सुमारे पंधरा वर्षांचा कार्यकाळ उलटून गेला. मात्र, सिंचन सोडून थातूरमातूर उपाययोजनाच प्रामुख्याने केल्या जात असल्याचे दिसून येते. विदर्भाचा सिंचनाचा अनुशेषसुद्धा केंद्र व राज्यातील सरकार बदलल्यानंतरही भरून निघालेला नाही. यातच आता वैधानिक मंडळेसुद्धा गुंडाळण्यात आली आहेत. त्यामुळे अनुशेषाची आकडेवारीसुद्धा समोर येणे बंद झाले आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले असल्याचे चित्र असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सेनेचे विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनेच्यावतीने मुलाचे संगोपान आणि शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत दिली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्या 14 गावांच्या पाण्यासाठी कैलास नागरे यांचा जीव गेला त्यांचे आत्मबलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी दानवे यांनी यावेळी दिली.
आगामी काळात पंचक्रोशीतील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी आणि शेती व पिण्याच्या पाण्याचा समस्या सोडविण्यासाठी पक्ष म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेना सह संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, आमदार सिद्धार्थ खरात, जयश्रीताई शेळके, आशिष राहाटे, तालुका प्रमुख दादाराव खारडे व नितेश देशमुख उपस्थित होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.