Congress performance Vidarbha : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या विदर्भाचे राजकीय चित्र आता बदलले आहे. विदर्भातील शंभर नगरपंचायत आणि नगरपरिषदांपैकी भाजपने ५५ जिंकल्या आहेत. महायुतीचा विचार करता शिवसेना ११ व राष्ट्रवादी काँग्रेस २ यांची बेरीज केल्यास ही संख्या ६८ इतकी झाली आहे. काँग्रेसला फक्त १९ जागेवर समाधान मानावे लागले.
विदर्भातून एकेकाळी काँग्रेसने दगडाला जरी उमेदवारी दिली तरी तो निवडून यायचा, अशी परिस्थिती होती. आंध्र प्रदेशातून आलेले माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. काश्मीरचे गुलाम नबी आझाद वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेस आपल्या पराभूत नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी विदर्भाचा वापर करीत होती.
आता मात्र संपूर्ण चित्रच भाजपने पालटून टाकले आहे. बड्या बड्या नेत्यांना विदर्भातून निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले थोडक्यात बचावले. पोस्टल बॅलेटवर ते निवडून आले. सावनेर काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचा राखीव मतदार संघ म्हणून ओळखला जायचा.
काटोल-नरखेड हा मतदारसंघ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावानेच ओळखला जायचा. मात्र केदार आणि देशमुखांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. असे असले तरी कालपर्यंत ग्रामीण भागात काँग्रेसचा जोर कायम होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस मजबूत होती. मात्र यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची पाळेमुळे आता कमजोर झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनिल देशमुख यांना त्यांच्या मतदारसंघातील काटोल नगरपरिषद जिंकण्यासाठी शेकापचा आधार घ्यावा लागला. केदारांच्या सावनेरमधून २२ पैकी भाजपचे २१ उमेदवार निवडून आले आहे. रामटेकचे काँग्रेसचे खासदार श्यामुकमार बर्वे यांना स्वतःचा प्रभागही वाचवता आला नाही. १९९५ साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हापासूनच भाजपने विदर्भावर फोकस करणे सुरू केले होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक महत्त्वाची खाती विदर्भाकडे आली. यात प्रामुख्याने अर्थ, ऊर्जा या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. विदर्भाच्या वाट्याला ५० वर्षात आले नाही ते सर्वाधिक महत्त्वाचे समजले जाणारे महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून विदर्भाला देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊर्जा व गृह ही महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. भाजपने ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असल्याचे नगर पालिकांच्या निकालावरून दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.