Markandeshwar Issue : विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कडेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली तेथील दगडांची उकल करण्यात आली होती. दशकभराचा कालावधी लोटूनही याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले होते. या मंदिराच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी करीत संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोलीत जनआंदोलन उभारले. गेल्या नऊ दिवसांपासून ते मार्कंडा येथे उपोषणाला बसले होते. हाच मुद्दा घेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी व पुरातत्व विभागाला खडे बोल सुनावले. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शेवटी प्रशासन जागे झाले. येत्या एक मार्चपासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत संत मुरलीधर महाराज यांनी उपोषण मागे घेतले.
खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या गडचिरोलीला निसर्गाची मोठी देण लाभली आहे. येथील मार्कंडा देवस्थान सवर्दूर प्रसिद्ध आहे. दहा वर्षांपूर्वी येथील मंदिरात पुनर्बांधणीच्या नावाखाली दगडाची उकल करण्यात आली. आता मंदिराचा विकास जलदगतीने होणार, असा विश्वास भाविकांना होता. पण दहा वर्षे लोटूनही मंदिरातील कामाला सुरुवात झाली नाही. शेवटी संतप्त झालेल्या संत मुरलीधर महाराज यांनी हा मुद्दा घेत गडचिरोलीत मोठे आंदोलन उभे केले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे महाराजांनी मार्कंडा येथे उपोषणाचे हत्यार उपसले. गेल्या नऊ दिवसापासून ते उपोषणाला बसले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मार्कडेश्वराचा हा मुद्दा समोर येताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला. मोठा गाजावाजा करून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मंदिराचे काम जलद गतीने पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. पण आता ते नेते गेले कुठे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे देशातील इतर मंदिराच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करायची. दुसरीकडे गडचिरोलीच्या ऐतिहासिक मंदिराकडे पुरते दुर्लक्ष करायचे हा दुजाभाव कदापी खपविल्या जाणार नसल्याचे ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. प्रशासनाने मार्कंडा येथे उपोषण करणारे मुरलीधर महाराज यांची भेट घेतली. याप्रसंगी विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. येत्या एक मार्च पासून मंदिराच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनकडून दिले गेले. यानंतर महाराजांनी उपोषण मागे घेतले. दिलेल्या तारखेस काम सुरू न झाल्यास मुरलीधर महाराज यांच्यासोबत भाविक व नागरिकांच्या उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.