
Nagpur News, 29 Apr : "धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्यांच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला दहशतवादी थांबतात का?"; असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.
वेडेट्टीवार यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं, अर्धवट वक्तव्य दाखवून काँग्रेसला (Congress) अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडियाने केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. या पर्यटकांमधील काही जणांना दहशतवाद्यांनी धर्म विचारून जे मुस्लिम नाहीत त्यांना टार्गेट करून गोळ्या झाडल्याची माहिती हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केल्याच्या दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित करत, "धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?" असं अजब वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं.
मी बोललो त्याच्या आधीचं आणि नंतरचं वक्तव्य दाखवण्यात आलं नाही. अर्धवट वक्तव्य दाखवून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडिया करत आहे." शिवाय आमच्या पक्षाची भूमिका राहुल गांधी यांनी स्पष्ट केली आहे. मी काल बोलताना म्हटलं की, पहिल्यांदा असं होतंय अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला आणि तेवढंच दाखवलं गेलं पण मी त्यापुढेही बोललो आहे.
माझी सर्व चॅनेलला विनंती आहे की, माझं वक्तव्य पूर्ण दाखवावं. तर देश अस्थिर करण्यासाठी दोन समुदायांना आपापसात लढवण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केलं आहे. अशा शक्तींवर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारसोबत काँग्रेस उभी आहे. धर्म विचारून मारलं गेलं. हा देश कमजोर करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.
अतिरेक्याला कोणता धर्म नसतो. हे मी बोललो होतो. त्याच्या मागे पाकिस्तानचा जो उद्देश होता तो भारताला कमजोर करण्याचा होता. हा हल्ला भारतावर असल्यामुळे दहशतवाद्यांना हे सर्व शिकवून पाठवलं होतं. 26 वर्षानंतर पर्यटकांवर हल्ला होता. हे लावण्याकरिता माझं भाषण तोडून मोडून दाखवल्याचंही ते म्हणाले.
पहलगाम (Pahalgam) येथील दहशतवादी हल्ल्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, " मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या हल्ल्या प्रकरणी लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं काही घडलं नसल्याचं म्हणत आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती? 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, केवळ बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.