Amravati Political News : लोकसभा निवडणूक काळात आपल्याकडून पैसे घेत दुसऱ्याचा प्रचार केल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्यावर केला. खासदार राणा यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानंतर अॅड. ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. (This couple has spent more than the limit during the election period)
आता याप्रकरणी राण दाम्पत्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी आज (ता. १४) स्पष्ट केले. नवनीत राणा व रवी राणा दाम्पत्याने अमरावतीमधील राजकीय वातावरण बिघडविल्याचा आरोप करीत ठाकूर म्हणाल्या की, या दाम्पत्याने निवडणूक काळात मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.
हा प्रकार न दिसणारा निवडणूक विभाग झोपलाय का, असा प्रश्नही त्यांनी केला. राणा यांनी निवडणूक काळात पैसे वाटप केल्याची एकप्रकारे स्वत: कबुलीच दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह ईडीनेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार ॲड. ठाकूर यांनी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आमदार ॲड. ठाकूर यांनी टीका केली. फडणवीस राणा दाम्पत्याला पाठीशी घालत आहे. ज्या दहीहंडी कार्यक्रमासाठी फडणवीस अमरावतीत आले होते, त्या कार्यक्रमाला अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित होती.
या त्याच शिल्पा शेट्टी आहेत, ज्यांच्या पतीने ‘ब्लू फिल्म’ बनविल्या. अशा लोकांना राणा दाम्पत्य उत्सवांसाठी बोलवत असेल आणि त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे (Devendra Fadanvis) नेते उपस्थित राहात असतील तर विचार करणे गरजेचे आहे, असेही आमदार ॲड. ठाकूर म्हणाल्या.
राणा दाम्पत्याच्या पापांचा घडा आता भरला आहे. त्यांच्यावर आपण निश्चित अब्रूनुकसानीचा दावा टाकणार आहोत. त्यांनी केलेले आरोप हे ‘क्रिमिनल अफेन्स’ आहेत. त्यामुळे आपण त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा सज्जड दम विधी शाखेतून पदवीप्राप्त असलेल्या आमदार ॲड. ठाकूर (Yashomati Thakur) यांना दिला. नवनीत राणांनी जात चोरली आहे आणि ते प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणा दाम्पत्य आणि ॲड. ठाकूर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राणा यांच्या विरोधकांनी एकत्र येत त्यांना घेरण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र राज्यात व केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार सध्या राणा यांच्या पाठीशी असल्याने विरोधक राणांवर कसे हल्ले करतील व त्यातून राणांना फायदा होईल की नुकसान, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.