Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

Latur Politics : दिवंगत विलासराव देशमुख हे एकेकाळचे मराठवाड्यातले मातब्बर नेते, पण त्यांनाही एकदा पराभवाची चव चाखायला लागली होती. ती कशी यामागची ही कारणमिमांसा
Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : Sarkarnama

Sarkarnama Podcast : एरवी गजबजून जाणारे, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार याची चर्चा करणारे रस्ते, हॉटेल, पानटपऱ्या आदी ठिकाणचे अड्डे आज मात्र अनपेक्षितपणे शांत झालेले होते. काहीही झाले तरी या वेळी धडा शिकवायचाच, असा अनेकांचा निर्धार आज पूर्णत्वास गेला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी मोठा जल्लोष होईल, असं अपेक्षित होते. मात्र, तसं चित्र दिसले नाही... वातावरण शांत होते, जणू सन्नाटाच पसरला होता. कार्यकर्ते, जवळच्या लोकांच्या चुकांची शिक्षा नेत्याला मिळाली, ही खंत कदाचित लोकांच्या मनात असावी. आम्हाला फक्त चिमटा घ्यायचा होता, पण हा मोठा फटका बसला, जो आम्हाला द्यायचा नव्हता, अशी प्रतिक्रिया त्या दिवशी लातूरकरांची होती.

हे चित्र आहे लातूर शहरातील, १९९५ च्या विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झालेल्या दिवशीचं..... काँग्रेसचे मातब्बर नेते, त्यावेळचे कॅबिनेट मंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचा तब्बल ३२ हजार मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसमधीलच त्यांचे एकेकाळचे सहकारी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी विलासरावांना पराभूत केलं...... समोरचा उमेदवार मातब्बर किंवा योग्य होता म्हणून नव्हे तर विलासरावांची नकारात्मक प्रतिमा तयार झाल्यामुळे हा प्रसंग ओढवला होता..... मतदारांनी केलेल्या या पराभवापासून योग्य तो धडा घेतलेल्या विलासरावांना त्यानंतर दोनदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली.

१९९५ च्या निवडणुकीत विलासरावांना पराभूत करण्यासाठी चहूबाजूंनी एक लॉबी सक्रिय झाली होती. देशमुखांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या राजकीय दडपशाहीला म्हणजेच पॉलिटिकल अरोगन्सीला लोक, व्यापारी कंटाळले होते. लोकांच्या मालमत्ता हडपल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांवर होऊ लागला. दादागिरी, गुंडगिरीचे आरोप नित्याचेच झाले होते..... (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं मुख्यमंत्रिपद घालवण्यात विलासरांवाचा हात होता, अशी चर्चा एव्हाना पसरली होती. त्यातच विलासराव देशमुखांनी आपलं स्वतःचं दैनिक सुरू केले होते......मराठवाडा हे दैनिक डबघाईला आले होते. तेथील काही लोकांनीच हे दैनिक चालवण्याचे साकडं विलासरावांना घातले होते. त्यानुसार विलासरावांनी मराठवाडा घेऊन तिथं आपलं दैनिक एकमत सुरू केले.

त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होण्यासाठी हेही एक कारण ठरले. विलासरावांच्या सर्व जाहिराती अर्थात सहकारी संस्था, साखर कारखाना, शासकीय खाती यांच्या जाहिराती त्यांच्याच दैनिकाला जाऊ लागल्या. परिणामी, स्थानिक वृत्तपत्रं उपाशी राहू लागली. साहजिकच पत्रकारांच्याही लॉबीत चलबिचल सुरू झाली. दरम्यान, लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे कव्हेकरांनी स्वतंत्र पॅनेल उभं करून बहुमत मिळवलं होतं..... ते सभापतीही झाले. यासाठी त्यांना माजी मुख्यमंत्री (कै.) शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडून बळ मिळाले होते, अशी चर्चा त्यावेळी होती.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : धर्माधारित ध्रुवीकरण की जात आधारित ध्रुवीकरण

ही घडामोड साधी नव्हती. विलासरावांना आव्हान देण्याची बिजे इथंच रोवली गेली होती, हे नंतरच्या घटनाक्रमावरून सहजपणे लक्षात येईल. पॉलिटिकल अरोगन्सी, कार्यकर्त्यांची गुंडगिरी, या ना त्या कारणावरून छळले गेलेले व्यापारी आणि जाहिराती न मिळाल्याने दुखावल्या गेलेल्या पत्रकारांच्या लॉबीने मग शोध सुरू केला तो विलासरावांना आव्हान देऊ शकणाऱ्या राजकीय नेत्याचा. त्यातून दोन नावं समोर आली. बळवंत जाधव आणि शिवाजीराव कव्हेकर ही ती नावं......

.....कव्हेकर बाजार समितीत स्वतंत्र पॅनेल उभे करून बहुमत मिळवून सभापती झाले होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या नावाला पसंती मिळाली. विविध प्रकारे कव्हेकरांच्या शिडात हवा भरली जाऊ लागली. राजकीय धडा शिकवण्यासाठी लातूरकरांनी केलेला हा काही पहिला प्रयोग नव्हता. यापूर्वी १९६७ मध्ये सहकारमंत्री (कै.) केशवराव सोनवणे यांनाही लातूरकरांनी असंच पराभूत केलं होतं. त्यावेळी जनता दलाचे (कै.) बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळवला होता. मैदान तयार झालं होतं. त्यात उतरून जनता दलाने शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आपल्या तिकिटावर लढावं असा आग्रह सुरू केला. उर्वरित काम लॉबीने केले आणि कव्हेकर जनता दलाचे उमेदवार झाले. तसंही त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, अर्थातच ती नाकारण्यात आली होती.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : अविश्वास ठराव….की प्रचाराचा धुरळा

आता कव्हेकर मैदानात उतरल्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातील देशमुख विरोधक कव्हेकरांच्या बाजूनं सक्रिय झाले. कव्हेकरांना 'रसद' पुरवण्यासाठी खास तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात त्या निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी लातूर मतदारसंघात एकदाही पाय ठेवला नव्हता. असं असलं तरी शरद पवार आता विलासरावांना सोडणार नाहीत, अशी चर्चा लोकांमध्ये पद्धतशीरपणे पसरवण्यात आली. पसरवली गेलेली ती चर्चा खरीच होती, याचा उलगडा नंतर झाला.

मोबाइल, व्हॉट्सअॅपसारखी साधनं हाताशी नसताना या व यांसारख्या अनेक चर्चा वेगाने पसरवण्याचं काम सुरू झालं...विलासरावांचे विविध क्षेत्रांतील मित्र त्यांच्यासाठी कामाला लागले होते. परगावांतील विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्राध्यापक मंडळी विलासराव विजयी होणारच, याची खात्री करून घेऊ लागली होती.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : आघाड्यांचे राजकारण पुन्हा रंगणार?

ऐन निवडणुकीच्या काळात स्थानिक वृत्तपत्रं विलासरावांच्या विरोधात बातम्यांचं खोदकाम करू लागली. जागा बळकावण्यासाठी एका मुस्लिम नागरिकावर विलासरावांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची बातमी स्थानिक दैनिकात आली. विलासरावांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठीची एकही संधी कव्हेकर समर्थकांनी वाया जाऊ दिली नाही.

शिवाजीराव पाटील कव्हेकर हे माझ्यासमोर मामुली आहेत, मी त्यांची पर्वा करत नाही, असं विलासराव एके ठिकाणी बोलून गेले आणि त्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. कव्हेकर समर्थकांनी

विलासरावांच्या या वक्तव्याचा विपर्यास करत मामुली या शब्दाच्या पुढे रे हा शब्द जोडून प्रचार सुरू केला. मामुली या शब्दातील मा म्हणजे मारवाडी, मु म्हणजे मुस्लिम, लि म्हणजे लिंगायत आणि रे म्हणजे रेड्डी! कव्हेकर माझ्यासमोर मामुली आहेत, मी त्यांची पर्वा करत नाही या वाक्याचा अर्थ मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाची मी पर्वा करत नाही असा लावण्यात आला. त्यात रेड्डीही जोडण्यात आलं.

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : संवेदना हरवल्यात?

सारी समीकरणंच बदलून गेली. हक्काचे मानले जाणारे मुस्लिम मतदानही विलासरावांपासून दूर झाले. कव्हेकर जनता दलाचे उमेदवार असल्यामुळे विलासरावांच्या विरोधात मतदान करण्यासाठी मुस्लिमांची अडचण झाली नाही. शिवसेना किंवा भाजपचा उमेदवार असता तर मुस्लिम मतदारांनी किमान एकदा तरी विचार केला असता..

धाकटं, नकटं आणि कानतुटकं, हा वाक्प्रचार त्यावेळी खूप प्रचलित झाला होता. धाकटं म्हणजे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव, नकटं म्हणजे आबासाहेब पाटील आणि कानतुटकं म्हणजे एस. आर. देशमुख. विलासरावांच्या अत्यंत जवळ असलेल्या या तिघांवर त्यावेळी कार्यकर्त्यांचा रोष होता. हे तिघं आपल्याला विलासरावांपर्यंत पोहोचू देत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. विलासराव सर्वसमावेशक होते. सर्व समाजांतील कार्यकर्त्यांना त्यांनी विविध पदांवर संधी दिली होती. दिलीपराव देशमुखांच्या रूपाने सत्तेचे कुटुंबातच केंद्रीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या हे लक्षात आलं होतं....

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : राज्यपाल की सत्तेतल्या विरोधकांचे विरोधक

विलासरावांचा चेहरा सर्व समावेशक होता. त्यांनी विविध समाजातील कायकर्त्यांना सत्तेच्या पदावर संधी दिली होती. दिलीपराव देशमुखांच्या रूपाने सत्तेचं कुटुंबातच केंद्रीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या हे लक्षात आलं होतं. या तिघांवरील रोषाचा फटका विलासरावांना सहन करावा लागला. सर्वासमावेशक चेहरा अशी ओळख असलेल्या विलासरावांची भाषाही बदलू लागली होती. ती लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या लक्षात येत होती.

अशा रितीने सर्व बाजूंनी विलासरावांच्या बाबतीत नकारात्मकता पसरली होती. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं...., समोरचा उमेदवार मातब्बर किंवा चांगला होता म्हणून नव्हे. पराभवाचा सामना केल्यानंतर विलासराव देशमुखांमध्ये मोठे बदल झाले. ते क्षमाशील झाले, त्यांची भाषा बदलली. ते लोकांमध्ये मिसळू लागले. हे करत असतानाच त्यांनी कव्हेकर यांना फार काही करता येणार नाही याची काळजी घेतली, ती त्यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देऊन.

मामुलिरे असा अपप्रचार, मुस्लिम नागरिकाला मारहाणीचे खोटे वृत्त प्रसिद्ध करवून कव्हेकर यांनी विजय मिळवला, त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं.... त्यांची याचिका फेटाळली गेली, मात्र कव्हेकर यात अडकून राहिले. दरम्यानच्या काळात विलासरावांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधान परिषदेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत कव्हेकरांनी शरद पवारांच्या सूचनेचे पालन न करून त्यांची नाराजी ओढवून घेतली, असं सांगितलं जातं.... त्यामुळे कव्हेकरांच्या पुढील निवडणुकीचा विषय तेथे बऱ्यापैकी संपुष्टात आला होता.

शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लातुरातील एका कार्यक्रमात कव्हेकरांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली. मुस्लिम मतदार नाराज होतील, असा विचार करून कव्हेकरांनी ती नाकारली. हा नकार दर्शवण्याचा एक भाग म्हणून ते विधानसभा अधिवेशनात हिरवा जॅकेट परिधान करून उपस्थित राहिले. त्यामुळे इकडे मतदारसंघात चुकीचा संदेश गेला. तसंही लातूरकरांना विलासरावांना फक्त चिमटा काढायचा होता, म्हणजे त्यांच्या विजयाच्या मतांची आघाडी कमी करायची होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यामुळे लातूरकरांच्या मनात खंत होतीच. पुढील निवडणुकीत ती दूर करत मतदारांनी विलासरावांना विजयी केलं आणि त्यानंतर विलासरावांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे मात्र स्थिर राहिले नाहीत. सध्या ते भाजपमध्ये आहेत.

Edited By - Anuradha Dhawade

Sarkarnama Podcast :
Sarkarnama Podcast : अजितदादांचं बंड आणि महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com