

Yavatmal News: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना अचानक वेग आला. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या माघारीनंतर दिग्रस, पुसद आणि दारव्हा तालुका गटातील चित्र स्पष्ट झाले असून, तीन जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिग्रस तालुका गटातून खासदार संजय देशमुख हे बिनविरोध झाले. सुरुवातीपासूनच या गटाकडे राजकीयदृष्ट्या लक्ष लागले होते. मात्र, अखेर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने देशमुख यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
पुसद तालुका गटात विजय जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली. पुसदच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. तर दारव्हा तालुका गटातून ऐनवेळी मतदार यादीत नाव बदलून आलेले सुशील राठोडही बिनविरोध झाले. त्यामुळे तीन तालुका गटांमध्ये निवडणुकीची रंगत संपुष्टात आली असली, तरी जिल्हा बँकेच्या उर्वरित गटांमध्ये राजकीय संघर्ष कायम राहणार आहे. तीनही जागा महायुतीच्या असल्याने युतीला मतदानापूर्वीच बळ मिळाले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. त्यामुळे प्रत्येक गटात उमेदवारांची संख्या वाढली होती. छाननीनंतरही अनेक उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे होती. मात्र, माघारीच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय हालचालींमुळे काही गटांतील लढतीचे चित्रच बदलले.
बिनविरोध निवडीमुळे सहकारातील राजकीय ताकदीचे संकेत मिळाले असले, तरी उर्वरित जागांवरील लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, यासाठी आगामी निवडणुकीतील प्रत्येक गटातील निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.
नामांकन माघारीच्या अंतिम दिवशी तीन प्रमुख तालुका गटांत बिनविरोध निवडी झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणित बदलले आहे. आता उर्वरित गटांमध्ये कोण कोणाच्या बाजूने उभे राहते आणि माघारीनंतर कोणती नवी समीकरणे आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.