Yavatmal Bank Election : अध्यक्षाच्या नावावर एकमत न झाल्याने सुंदोपसुंदी, आता निवडणूक २५ सप्टेंबरला !

Yavatmal District Central Co-operative Bank : राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Yavatmal District Central Co-operative Bank
Yavatmal District Central Co-operative BankSarkarnama

Yavatmal District Central Co-operative Bank Election News : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही कुण्या एका उमेदवाराच्या नावावर एकमत न झाल्याने अद्यापही सुंदोपसुंदी कायम आहे. (There are signs of politics heating up)

अध्यक्षाच्या नावावरच शिक्कामोर्तब न झाल्याने जिल्हा निबंधकांनी आता ही निवडणूक २५ सप्टेंबरला घेण्याचे ठरवले आहे. अवघ्या सात दिवसांवर ही निवडणूक असून, जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात यावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची चढाओढ लागली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दोन गटांत विभागली गेली आहे. त्याचे राजकीय परिणामही जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडीत दिसून येत आहेत. जिल्हा बँकेत संचालक असलेल्या सर्वच पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. महाविकास आघाडी असो अथवा महायुती दोघांकडूनही इच्छुकांची संख्या कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे.

नेत्यांच्या बैठका झाल्या. मात्र, स्पष्ट संख्याबळ आजघडीला कुणाकडेही नाही. त्यामुळे आकड्यांचा खेळ जुळविण्याबरोबरच एका नावावर शिक्कामोर्तब करणे, असे दुहेरी आव्हान आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना पेलावे लागत आहे. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाच सप्टेंबरला या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

१८ सप्टेंबरला अध्यक्षांची निवड केली जाणार होती. त्यामुळे इच्छुकांनी संचालकांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. महायुतीकडून इच्छुकांची संख्या जास्त होती. त्यामुळे युतीच्या नेत्यांमध्ये बराच खल झाला. त्यातही नाव निश्चित न झाल्यानेच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठाकरे गटाचा काँग्रेसला प्रस्ताव...

शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Election) लढवण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. ठाकरे गटाचे संचालक माजी मंत्री संजय देशमुख यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून काँग्रेसला (Congress) पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. मात्र, काँग्रेसने अद्यापही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु ठाकरे गटाच्या एन्ट्रीने काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घुईखेडकरांच्या इच्छेवर विरजण...

बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संचालक तथा प्रभारी बँक अध्यक्ष वसंत घुईखेडकर यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला त्यांच्या नावाला वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नलही दिल्याची चर्चा होती. आता मात्र त्यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी आमदार इंद्रनील नाईक यांचे समर्थक तथा बँक संचालक अनुकूल चव्हाण यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पुढे केले गेल्याने घुईखेडकरांच्या इच्छेवर विरजण पडते की काय, अशी चिन्हे आहेत.

Yavatmal District Central Co-operative Bank
Yavatmal Crime News : आयपीएसच्या नावे फेक कॉल करीत पैसे उकळण्याचा प्रयत्न; रायटर, तलाठ्यालाही डच्चू !

आमदार लंडनहून आल्यावरच महायुतीचे शिक्कामोर्तब...

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे बँकेत संचालक आहेत. त्यामुळे बँकेवर अध्यक्ष भाजपचाच असावा, यासाठी बराच खल सुरू आहे. मात्र, भाजप आमदार मदन येरावार हे काही कामानिमित्त लंडन दौऱ्यावर गेले असल्याची माहिती आहे. परंतु ते लंडन दौऱ्यावर गेले असल्याची अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. असे असले तरी ते आज (ता. १९) जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतरच महायुतीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

कॉंग्रेसकडून मनीष पाटील आणि प्रकाश पाटील देवसरकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वसंत घुईखेडकर आणि अनुकूल चव्हाण, भाजपकडून अमन गावंडे, शिवसेना शिंदे गट राजुदास जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

Edited By : Atul Mehere

Yavatmal District Central Co-operative Bank
Yavatmal Pola News : शिंदे-देवेंद्रसोबत पळाले दादा… बळीराजाचा भुलला हो वादा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com