

Yavatmal DCC Bank: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकारणात मोठा राजकीय बदल घडला आहे. महायुतीच्या सत्तावाटपातील रस्सीखेच संपुष्टात आली असून, बँकेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार संजय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार संजय देशमुख यांना मोठा राजकीय फायदा झाल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.
महायुतीकडून बँकेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार संजय देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असून आता ते बँकेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहेत. तर बँकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विजय जाधव यांची प्रथम क्रमांकाचे उपाध्यक्ष,तर भाजपचे नितीन भुतडा यांची द्वितीय क्रमांकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि दोन्ही उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे.
संचालकपदाची न्यायालयाने ठरवून दिलेली मर्यादा पाहता त्यांना धाकधुक लागून होती.मात्र त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुख यांची बिनविरोध निवड झाली होती. अध्यक्षपदाच्या शर्यतीतही हीच घोडदौड कायम ठेवत खासदार संजय देशमुख यांनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे.राजकीय समीकरणांत मोठा बदल घडवत जिल्हा बँकेला इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला अध्यक्षपदावर बसण्याची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्वपक्षीय संचालकांना एकत्र आणत बँकेतील सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संचालकांसह सर्वांना एकत्र बसवून अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांची निवड बिनविरोध घडवून आणण्यात मंत्री संजय राठोड यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडली असताना नवे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसमोर बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आता नव्या नेतृत्वाकडून बँकेला उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बँकेच्या नव्या पदाधिकारी निवडीमुळे संचालक आणि शेतकरी सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.