

Yavatmal News : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वेगवान घडामोडी घडत आहेत. 19 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणुकीपूर्वीच आघाडी-युतीची गणिते जुळविण्यासाठी पडद्यामागील खलबते सुरू झाली आहेत. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, ‘कुणासोबत जायचे आणि कुणाला दूर ठेवायचे?’ याची चाचपणी सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका गटातील 16 आणि जिल्हा गटातील नऊ अशा एकूण 25 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. बँकेवरील सत्ता कायम ठेवण्याबरोबरच प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी प्रमुख पक्षांनी आतापासूनच राजकीय ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.
शिवसेनेकडून आतापर्यंत भाजपसोबत दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. संभाव्य युती, जागावाटप आणि तालुकानिहाय ताकदीचे गणित यावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, कोणाला किती जागा आणि कोणत्या जागा द्यायच्या, याचा पेच अद्याप कायम आहे. काँग्रेसनेही दोन बैठका घेतल्या आहेत. जिल्हा बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून स्वत:ला प्रमोट करणाऱ्या नेत्यांनी भाजपसोबत संवाद साधला आहे. शिवसेनेशीही काँग्रेसचा संवाद सुरू असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसची रणनीती नेमकी काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एका बाजूला शिवसेना-भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संभाव्य युती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची दोन्ही बाजूंशी सुरू असलेली चर्चा, यामुळे मध्यवर्ती बँकेची निवडणूक साधी सहकारी संस्थेची निवडणूक न राहता जिल्ह्यातील राजकीय शक्तिपरीक्षेचे मैदान बनण्याची चिन्हे आहेत. अंतिम मतदार यादीनंतर कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचाली आणखी तीव्र होणार असून इच्छुकांची धावपळही वाढणार आहे.
जागावाटपावर वर्चस्व कोणाचे?
आघाडी किंवा युती झाली तरी खरी परीक्षा जागा वाटपाचीच असणार आहे. तालुकानिहाय प्रभाव, मतदारसंघातील गटबाजी, सहकार क्षेत्रातील वजन आणि स्थानिक नेत्यांची ताकद लक्षात घेऊन उमेदवारी निश्चित करावी लागणार आहे. त्यामुळे संभाव्य आघाड्यांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पडद्यामागील चर्चांना वेग
या सत्तेच्या समीकरणासाठी सध्या बैठका, भेटीगाठी आणि पडद्यामागील चर्चांना वेग आला आहे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात गळा घालतो आणि कुणाला राजकीय धक्का देतो, याचे चित्र निवडणूक कार्यक्रमानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आगामी काळात जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.