नागपूर ः महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेनेनेही तयारी चालवली आहे. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दर वेळी आम्हाला निवडणुकांमध्ये राबवून घेतले जाते, उमेदवारी मात्र दिली जात नाही. यावेळी तिकीट द्यायचे नसेल, तर तसे स्पष्ट सांगा, नाही तर आमची तयारी आणि पैसा वाया जाईल, अशी रोखठोक भूमिका युवा सैनिकांनी बैठकीत मांडली.
महाविकास आघाडी होईल किंवा नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. याबाबत जो निर्णय व्हायचा तो होईल. मात्र, आपण गाफील राहून चालणार नाही. महापालिकेच्या (Municipal Corporation) सर्व प्रभागांत शिवसैनिकांनी (Shivsainik)लढण्याची तयारी करावी, असे निर्देश शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी दिले.
जिल्हाप्रमुख (Shivsena District Chief) प्रमोद मानमोडे यांनी शुक्रवारी सेना भवनात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी सर्वांची मते जाणून घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. शहराची नवीन प्रभाग रचना झाली तेव्हापासून शिवसैनिक आणि इच्छुक उमेदवार बैठकीची प्रतीक्षा करीत होते. महाविकास आघाडी झाल्यास किती जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील, स्वतंत्रपणे लढायचे की आणि कोणाला सोबत घ्यायचे असे अनेक प्रश्न शिवसैनिकांच्या मनात रेंगाळत होते. स्वतंत्रपणे निवडणूक लढायची असेल तर आतापासून तयारी करावी लागेल. त्याकरिता प्रत्येक प्रभागात तीन सक्षम उमेदवारांचाही शोध घ्यावा लागेल.
वेळेवर गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील निवडणुकीत असाच घोळ झाला होता. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे चार उमेदवारांना शोधण्यातच अनेकांचा वेळ गेला होता. त्याने निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचे नुकसान झाले. दीडशे नगरसेवकांच्या महापालिकेत शिवसेनेचे दोनच उमेदवार निवडून आले होते. यंदा असा घोळ होऊ नये याकरिता शिवसैनिकांनी आतापासूनच ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी बैठकीत केली.
महाविकास आघाडी संदर्भातील बोलणी व जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना आहे. शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार या संदर्भातील निर्णय होईल, असे प्रमोद मानमोडे यांनी सांगितले. तोपर्यंत शिवसेनेला सर्व जागांवर लढायची तयारी करायची आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रभागात संपर्क वाढवावा, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी, अशी सूचना मानमोडे यांनी केली. बैठकीला शहर प्रमुख दीपक कापसे, प्रवीण बरडे, किशोर पराते, नाना झोडे, अजय दलाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.