Maharashtra Assembly Election 2024 : साप समजून भुई थोपटण्याची भाजप, मनसेची खोड विधानसभेलाही कायम!

Why is Uddhav Thackeray against Hindu festivals? Criticism of MNS-BJP : माहीम मतदारसंघात दीपोत्सव कार्यक्रमातून प्रचार करत मनसेने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली. आचारसंहिता भंगाची ही तक्रार म्हणजे उद्धव ठाकरे यांचा हिंदू सणांना विरोध आहे, असा कांगावा भाजप आणि मनसेने सुरू केला आहे.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhansabha 2024 : गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने राज्यात विकासकामे केलेली आहेत, यावर भाजपचा विश्वास नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद संपलेली आहे, याबाबत भाजपला खात्री नाही, असे दिसत आहे. त्यामुळेच भाजप पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा साफ नाकारला होता. असे असतानाही विधानसभा निवडणुकीत भाजपने तोच मुद्दा उचलायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची याकामी भाजपला साथ मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाऱाष्ट्रात महायुतीची पीछेहाट झाली. यासाठी भाजपची रणनीती कारणीभूत ठरली. भाजपला धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका बसला. आपल्या समोर शरद पवार यांच्यासारखे मुत्सद्दी नेते, सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत, याचा विसर भाजपला पडला. विधानसभा निवडणुकीत भाजप ही चूक सुधारणार, असे वाटत होते, मात्र चित्र तसे दिसत नाही.

माहीम मतदरसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. त्यावर भाजपने नेहमीचाच प्रश्न उपस्थित केला आहे; तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांचा हिंदू सणांना विरोध का, उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी धर्म बदलला का?

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray : धक्कादायक : प्रचाराला जात असतानाच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका

भाजप आणि (MNS) मनसेचा साप समजून भुई थोपटण्याचा हा प्रकार विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. दीपोत्सवातून मनसेने आपल्या उमेदवाराचा प्रचार केला, त्या कार्यक्रमाचा खर्च उमेदवाराच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात धर्माचा संबंध आला कुठून? अन्य कोणत्याही पक्षाने अशा कार्यक्रमातून आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला असता तर भाजप आणि मनसेनेही निवडणूक आयोगाकडे अशीच तक्रार केली असती.

असे करताना भाजप आणि मनसे कोरोनाकाळात जातातच. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोरोनाकाळात ठाकरे यांनी विशिष्ट धर्मीयांना सूट दिली आणि हिंदूंच्या सणांवर बंदी घातली, असा सामान्य लोकांचा बुद्धीभेद करणार आरोप ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात. कोरोनाकाळ हा मानवजातीवरील संकटाचा काळ होता. त्यावेळी काळजी घेणे अत्यंत गरजेचे होते. त्याला अनुसरूनच सर्व राज्य सरकारांचे आणि केंद्र सरकारचेही वर्तन होते. मात्र भाजप आणि मनसे याद्वारे ठाकरे हे हिंदूविरोधी आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Shivsena UBT : मनसे विरुद्ध तक्रार, भाजपचा आक्षेप पण उद्धव ठाकरेंच म्हणणं निवडणूक आयोगानं ऐकलं

माझे हिंदुत्व अन्य धर्मांचा द्वेष करायला शिकवत नाही, असे उद्धव ठाकरे सतत सांगत असतात आणि येथेच भाजप आणि मनसेची खरी अडचण झालेली असते. त्यामुळे ठाकरे यांच्याविरोधात असा प्रपोगंडा करणे भाजपची गरज असते. महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटवरून धार्मिक मुद्द्यांवर आलेल्या मनसेचीही ती गरज झालेली आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि महायुतीची पीछेहाट झाली होती, हेही येथे लक्षात घ्यावे लागेल.

निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा होणारच नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र राजकीय लाभासाठी समाजात दुही पसरवणाऱ्या पक्षांनी आता भानावर येण्याची गरज निर्माण झाली आहे. धार्मिक मुद्दे चालणार नाहीत, हे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून मान्य केलेलेच आहे. लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत. लाडकी बहीण योजना सुरू केली आणि अत्यावश्यक वस्तूंची दरवाढ झाली. लोक याबाबत आता उघडपणे बोलू लागले आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाकडे वळला असावा, अशीही शक्यता नाकारता येत नाही.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Bjp News : भाजपचा मेगा प्लॅन तयार; बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस उतरले मैदानात

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील सामाजिक समीकरणेही बदलली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका महायुतीतील भाजपला बसला आहे. ते समीकरण मोडीत काढण्यासाठीही भाजपचा प्रयत्न सुरू असावा. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती आदी प्रश्नांनी समाज हैराण झालेला आहे. भाजपला हे प्रश्न सोडवायचे आहेत की धार्मिक विषय पुढे करून त्यापासून पळ काढायचा आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

कोणताही पक्ष कोणत्याही समाजाबद्दल अशी आकसाची भूमिका कशी घेऊ शकतो, कोणत्याही समाजाला वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात कसा उभा करू शकतो? याची उत्तरे राजकीय व्यवस्थेने द्यायला हवीत. लोकांना विकास हवा आहे, सामाजिक सलोखा, शांतता हवी आहे, मुलांना रोजगार हवा. समाजात सलोखा असल्याशिवाय राज्याची, देशाची प्रगती होऊच शकत नाही, हे भाजप, मनसेलाही माहीत आहे. बदललेल्या राजकीय, सामाजिक समीकरणांत आपला निभाव लागावा, यासाठीच भाजपकडून पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाचे कार्ड खेळले जात असावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com