Devendra Fadnavis News: मोदी सरकारने भगतसिंह कोश्यारींना 'पद्मभूषण' पुरस्कार का दिला? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं मोठं कारण
Nagpur News : भारत सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात 113 पद्मश्री, 13 पद्मभूषण तर 5 पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला.कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींची पद्मभूषण पुरस्कारांसाठी निवड करण्यात आल्यानंतर भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आल्यामुळे होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, काही छोट्या मनाचे लोक एकप्रकारे विवाद निर्माण करत आहेत. मला कोणत्याही विवादात पडायचं नाही. पण काही लोकांच्या काळात काय काय घडलंय,कोणाला पद्मश्री मिळालाय हे सांगितलं, तर ते आजच्या दिवसाचं औचित्य राहणार नाही. म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही अशी सणसणीत चपराक फडणवीस यांनी विरोधकांना लगावली.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्कार का देण्यात आला यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांचं एकूण जीवन पाहिलं तर ते समर्पित जीवन जगलेले आहे. देशाच्या प्रगतीकडं त्यांचं काम असल्याचंही त्यांनी म्हटलं.
भगतसिंह कोश्यारी यांनी वन रँक वन पेन्शन,सैनिकांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याचा उल्लेखही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विरोधकांना काही छोट्या मनाचे लोकं एकप्रकारे विवाद उभा करतात. आता काहींच्या काळात कोणाला काय काय देण्यात आलं,त्या वादात मी पडत नाही. नाहीतर दिवस पुरणार नाही,असा चिमटा काढला.
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा...!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबाने सन्मानित केले.याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान” असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
'आमच्यासाठी हे त्रासदायक...'
केंद्र सरकारकडून भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याच मुद्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अशातआता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हटलंय.
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आमच्यासाठी हे त्रासदायक आहे. शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील, अशी खोचक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

